अहमदनगर- काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे आमच्या बैठकांना उपस्थित राहत आहेत. यातच सर्व काही आले असे सांगत पालकमंत्री राम शिंदे यांनी विखे आणि भाजपमधील अंतर आता नावापुरते राहिले असल्याचा निर्वाळा दिला. युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते.
१२ एप्रिल रोजी नगर येथे आयोजित पंतप्रधान मोदी यांच्या सभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये अधिकृत पणे प्रवेश करणार असल्याचे वृत्त माध्यमातून येत आहे. विखे पाटील हे भाजपमध्ये सक्रिय असल्याचे त्यांनी सूचित केले. विखे यांची भूमिका आता लपून राहिलेली नाही. ते आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करत आहेत. त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला होणार आहे. यानिमित्ताने आघाडीला 'जोर का झटका' बसला आहे. आघाडीचा पराभव अटळ असल्याचा दावा शिंदे यांनी यावेळी केला.
दोन दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे यांनी सुजय यांच्या निवडणूक पक्ष कार्यालयात येऊन पालकमंत्री शिंदे आणि युतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. ही बैठक डॉ. सुजय विखे यांचा प्रचार आणि मोदींच्या सभेच्या अनुषंगाने झाल्याची माहिती आहे. तर या बैठकीचे काही फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाले आहेत. राधाकृष्ण विखे हे डॉ. सुजय यांचा उघडपणे प्रचार करत असले तरी काँग्रेसने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने विखे यांच्यावर कारवाईची मागणी केली असली तरी अद्याप अशी कुठलीही कारवाई करण्याच्या मनःस्थितीत काँग्रेस नाही. या परिस्थितीत विखे स्वतःहून काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत. त्यामुळे १२ एप्रिल रोजी होणाऱ्या मोदी यांच्या सभेत ते अधिकृत प्रवेश करणार नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे यांनी याबाबत कुठलेही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही.