अहमदनगर - जमिनीचा सातबारा, आठ अ, फेरफार आदी सर्वसामान्य नागरिकांच्या उपयोगाची कागदपत्रे आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. यासाठी 'किऑस्क' प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या प्रणालीचे उद्घाटन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते रविवारी (१६ जून) पार पडले. या प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ तसेच पैसा वाचेल, असे ते यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 'किऑस्क' प्रणालीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथे पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते या प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी रीतसर २० रुपये भरून आपला सातबारा काढून या प्रणालीचे उदघाटन केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, तहसीलदार (महसूल) सुधीर पाटील यांच्यासह महसूल विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
सन १९३० पासूनचे जवळपास पावणेदोन कोटी सातबारा, फेरफार याचे फिडिंग या प्रणालीमध्ये करण्यात आले आहे. आता या कागदपत्रांसाठी तलाठी, सर्कल किंवा तहसील कार्यालयात जावे लागणार नाही. ही प्रणाली उपयुक्त वाटल्यास लवकरच तालुका स्तरावर हे मशीन बसवण्यात येईल. एटीएम सारखे हे मशीन असून वापरण्यास सोपे असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी दिली.