अहमदनगर- मंत्री पदाचा लवाजमा बाजूला ठेवून वस्त्रोद्योग मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतात खरीप हंगामाची पेरणी करण्याचा आनंद लुटला. या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांशी पाऊस, पाणी, बियाणे, खते याबाबत सविस्तर चर्चाही केली. यावेळी पालकमंत्र्यांना पेरणी करताना पाहून अनेक शेतकरी आवाक झाले होते.
पालकमंत्री शिंदे जामखेड तालुक्याचा दौरा करित होते. प्रवासा दरम्यान त्यांना रस्त्यालगत असलेल्या शेतात पेरणी चालू असल्याचे दिसले. शेतकरी आजिनाथ हजारे त्यांच्या शेतात पेरणी करीत होते. ते पाहून पालकमंत्री राम शिंदे यांनी आपल्या वाहन चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले व आजिनाथ हजारे यांच्याशी भेटून त्यांचा सोबत पीक-पावसावर चर्चा केली. यावेळी एका शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म असल्यामुळे त्यांना पेरणी करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी दोर हातात घेऊन आज पेरणीचा आनंद घेतला. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या निमित्ताने "महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे" अशी शिंदे यांनी विठ्ठलाला प्रार्थनाही केली.
रोहित पवारांमुळे शिंदेना राजकीय पेरणीचीही गरज...
राम शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सलग दोन वेळेस त्यांनी या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. मतदारसंघावर त्यांचे वर्चस्व नेहमीच राहिले आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात चांगलेच लक्ष घातले आहे. रोहित पवार यांनी दुष्काळी परिस्थितीत या ठिकाणी शेतकऱ्यांना हात देत पाण्याचे टँकर पुरविले होते. त्याचबरोबर त्यांनी अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ काढण्याचेही काम केले होते. जामखेड-कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी मतदारांशी संवाद साधला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास रोहित पवारही इच्छुक आहेत. याकरिता रोहित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्ज करून उमेदवारीही मागितली आहे. त्यांचे सततचे या मतदारसंघातील दौरे आणि वाढवलेला जनसंपर्क पाहता राम शिंदे यांच्या पुढे ते निश्चितच आव्हान निर्माण करतील असे बोलले जात आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात सुजय विखे यांना अपेक्षित आघाडी मिळाली नाही. एक प्रकारे राम शिंदे यांनी ही धोक्याची घंटा समजली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी तयारीचा भाग म्हणून राम शिंदे मतदारसंघात सक्रिय झाल्याचे मानले जात आहे.