अहमदनगर - उद्यापासून रामनवमीच्या उत्सवाला सुरूवात होत आहे. या निमित्ताने साई संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती संस्थानचे उपअधिकारी प्रविण ठाकरे यांनी दिली. दरवर्षी रामनवमीच्या निमित्ताने हजोरोंच्या संख्येने भाविक शिर्डी येथे साईच्या दर्शनाला येत असतात.
रामनवमी उत्सवाची सुरुवात १९११ मध्ये साईबाबांच्या अनुमतीने करण्यात आली. तेव्हापासून प्रतिवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात शिर्डीमध्ये साजरा केला जातो. उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्यवस्था सुखकर व्हावी यासाठी संस्थानच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच उन्हापासून संरक्षणासाठी मंदिर व परिसरात मंडप उभारण्यात आलेले आहे. साईभक्तांच्या अतिरिक्त निवासासाठी साईनगर मैदान, साईबाबा भक्तनिवास, साईधर्म शाळा या ठिकाणी सुमारे ५५ हजार चौरस फुट मंडप उभारण्यात आला आहे.
मुंबई तसेच राज्यभरातून पालखी सोबत येणाऱ्या पदयात्रींची निवा-याची सोय व्यवस्थित व्हावी यासाठी संस्थानच्यावतीने मुंबई ते शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी कापडी मंडप उभारण्यात आले आहेत. या मंडपात विद्युत व पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. तसेच पालख्या शिर्डी येथे आल्यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सिन्नर ते शिर्डी या मार्गावर पदयात्रींना आवश्यकतेनूसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.
गुरुस्थान मंदिरासमोर, दर्शनरांग, नवीन भक्त निवास, साईआश्रम, जुने प्रसादालय व नवीन श्री साई प्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहेत. याची माहिती साई संस्थानचे उपकार्यकरी अधिकारी ठाकरे यांनी दिली. रामनवमी उत्सवानिमित्ताने समाधी मंदिर व परिसरात दिल्ली येथील साईभक्त स्नेहा शर्मा यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट आणि मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.