अहमदनगर - शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला साईबाबांच्या पहाटेच्या काकड आरतीने सुरुवात झाली. आज रामनवमीचा मुख्य दिवस असल्याने या उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन भाविक शिर्डीत दाखल होत आहेत.
रामनवमी उत्सव आणि पालखीचे एक वेगळे नाते असल्याने या उत्सवासाठी खास करुन मुंबईहून मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होतात. पंधरा दिवसांचा पायी प्रवास करुन शिर्डीत येऊन साईंच्या दर्शनासाठी भाविक येतात.
रामनवमी उत्सवाचे महत्व मोठे असल्याने या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांची मांदियाळी देशभरातून शिर्डीत जमते. अषाढीचे वेध लागले की वारकऱ्यांची दिंडी ज्याप्रमाणे पंढरपुराकडे निघते त्याचप्रमाणे रामनवमीसाठी साईभक्तांच्या पायी पालख्या शिर्डीकडे येतात. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत या प्रमुख शहारांच्या बरोबरीनेच अनेक गावांतूनही शिर्डीला भाविक पायी चालत येतात. पायी चालत आल्यावर दु:ख, संकट दूर करुन आपल्या मनोकामना साईबाबा पुर्ण करतात, अशी भाविकांचा श्रद्धा असते.