अहमदनगर - शहराजवळील नागरदेवळे गावातील श्री माऊली स्वदेशी गो-पालन संस्थेच्यावतीने पंचगव्यापासून आरोग्यदायी राखीची निर्मिती करण्यात आली आहे. श्री माऊली गो-पालन संस्थेत सध्या वेदांचा नाद घुमत असतानाच आरोग्यदायी अशा पंचगव्याच्या राखीची निर्मिती केली जात आहे. गो-शाळेचे चालक माऊली शिर्के यांच्या अभ्यासात्मक कल्पनेतून हे साकारण्यात आलंय.
गाईचे शेण, गोमूत्र, भीमसेनी कापूर, गुगूळ, तूप, तांदूळ या सर्व औषधांचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून गोपालन संस्थेला आर्थिक हातभारदेखील लागणार आहे. या पंचगव्ययुक्त राखीची किंमत पाच रुपये आहे. मात्र, या समवेत २० रुपये गोसेवेसाठी घेतले जाणार आहेत. त्यामुळे ही राखी २५ रुपयांना मिळणार आहे.
गोशाळेला पशुखाद्य, गाईंसाठी औषधे, गाईंच्या आरोग्य तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांची फी इत्यादी खर्च असतो. त्यामुळे आर्थिक गाडा हाकण्यासाठीदेखील मदत होईल, असे संस्थाचालक माऊली शिर्के यांनी सांगितले. गाईंसाठी टँकरने पाणी मागवावे लागते. रोज हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते.
महिन्याचा हजारो रुपयांचा खर्च लागतो. उत्पन्न कमी व खर्च जास्त आहे. मात्र, गोवंश जगले पाहिजे व गोमाता पूज्यनीय असल्याने त्रास सहन करून विविध मार्गाने दानशूरांच्या मदतीने पैसा गोळा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्यदायी पंचगव्य राखीची निर्मिती केली आहे, असे ते म्हणाले.
५ रुपये प्रती राखीची किंमत व २० रुपये गोसेवा मूल्य, असे एकूण २५ रुपये ग्राहकांकडून आकारण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त राख्या घेऊन गोशाळेस आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन माऊली शिर्के यांनी केले.