अहमदनगर- जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये नुकसान झाले आहे. तर कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे वादळी पावसाच्या तडाख्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे. तसेच परिसरातील तब्बल 21 घरांची पडझड झाली आहे.
दक्षिण नगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, नेवासा, नगर, राहुरी, जामखेड आदी तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वारा आणि पावसाचा तडाखा बसला आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या जनतेला या पावसाने दिलासा देण्यापेक्षा नुकसान अधिक केल्याने आधीच अडचणीत असलेला बळीराजा अजूनच हवालदिल झाला आहे.
जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे, जनावरांच्या गोठे, आणि गोदामांचे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून त्याचप्रमाणे विजेचे खांब आणि तारा ही तुटल्या आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव या ठिकाणी रात्री उशिरा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. काष्टी वागदरी, लिंपणगाव, लोणी व्यंकनाथ, टाकळी कडेवळीत, येळपणे, पिसोरी बुद्रुक गावात जोरदार पाऊस झाला. तर पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी, पाडळी आदी ठिकाणी संध्याकाळ नंतर जोरदार पाऊस सुरु झाला. रात्री उशिरापर्यंत या परिसरात पाऊस सुरू होता. मान्सूनचे आगमन लांबले असले तरी मान्सूनपूर्व पाऊस वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात दाखल झाला आहे.