अहमदनगर- लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचे समर्थन करीत त्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे माझा भाजप प्रवेश हा आता मुद्दा राहिला नाही, असे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये केले आहे. तसेच मला मंत्रीपद देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि ते जेव्हा सांगतील तेव्हा शपथ घेणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राधाकृष्ण विखे यांचा भाजपमध्ये केवळ औपचारिक प्रवेश उरला असताना आता त्यांना कोणते खाते मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचे आवडते कृषी खाते त्यांना दिले जाणार की वाढीव एफएसआय प्रकरणात अडचणीत आलेल्या प्रकाश मेहतांचे गृहनिर्माण खाते त्यांना देणार यावर अंदाज बांधले जात आहेत. मात्र, यावर विखेंनी सावध भूमिका घेत हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे म्हटले आहे.
यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. विखे म्हणाले की, काँग्रसची आत्मचिंतन करण्याची वेळही निघून गेली असून काँग्रेस नेत्यांनी अधोगतीची जबाबदारी स्वीकारावी. तसेच काँग्रेसमधील मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱया आणि सामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱया नेत्यांनी आता स्वतःहून बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची आवश्यकता आहे, असेही विखे म्हणाले.
आमदारांसोबत किंवा एखाद्या शिष्ठ मंडळासोबत भाजप प्रवेश करणार असल्याच्या बातमीत तथ्य नसून प्रत्येक आमदाराला त्याचा नर्णय घेण्याचा अधिकार आहे. तसेच त्या बाबतीत मुख्यमंत्री स्वत: निर्णय घेतील. असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.