अहमदनगर - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी महिलांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तारकेश्वरी दिनेश राठोड या गरोदर महिलेने साहसी क्रीडा प्रकारात सहभागी होऊन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
शिर्डी 'नॅशनल अॅडव्हेंचर फाऊंडेशन चॅप्टर'च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांच्यासोबत पॅरामोटरमध्ये बसून दोन हजार पाचशे फूट उंच आणि अकरा किलोमीटर लांब उड्डाण तारकेश्वरी यांनी केले. विशेष म्हणजे सहा महिन्याच्या गरोदर असलेल्या पुण्याच्या तारकेश्वरींनी मऱ्हाटमोळा पोशाख घालत देवळाली प्रवरा शिवारात हे धाडस केले.
हेही वाचा - जगाने झिडकारलं.. स्वतः यातना भोगणाऱ्या 'त्या' 'दामिनी'ने एड्सग्रस्तांसाठी उभी केली चळवळ
मागील अनेक दिवसांपासून तारकेश्वरी यांची पॅरामोटरमधून उड्डाण घेण्याची इच्छा होती. मात्र, गरोदरपणाच्या सुरवातीच्या काळात त्यांना ते शक्य झाले नाही. आज(रविवारी) महिला दिनाचे निमित्त साधत डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी हे उड्डाण घेतले. महिला कोणत्याही अवस्थेत धाडस करू शकतात हा संदेश त्यांनी दिला.