अहमदनगर - सौर उर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येतो. त्यामुळे सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहूरी येथे केले.
जिल्ह्याच्या विकास योजनेमधे कोणतीही कपात नाही-
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मागील काळात कोरोना प्रादुर्भावामुळे विकास कामे थांबली होती. शासनाने कोरोना नियंत्रणासाठी मोठया प्रमाणावर उपाययोजना राबविल्या. गोरगरिबांना मोफत धान्य पुरवठा केला. आरोग्य सेवा दिली. जनतेच्या आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. लॉकडाऊनमुळे शासनाला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. केंद्र शासनाकडून अद्यापही राज्याच्या वाटयाचे जीएसटीचे सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. असे असले तरीही जिल्ह्याच्या विकास योजनेमधे कोणतीही कपात केली नाही. आमदारांना त्यांचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून दिला.
शेतकऱ्यांनी शेती पंपाचे सवलतीच्या दरातील वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घ्यावा-
शेतीच्या थकित वीज बीलासाठी सवलत योजना शासनाने जाहीर केली आहे. राज्यातील 44 लाख शेती पंप ग्राहकांची सुमार 45 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. शासनाने शेती पंपाच्या बिलांवर सवलतीची योजना जाहिर केली आहे. शेतकऱ्यांनी शेती पंपाचे सवलतीच्या दरातील वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेण्याचे व शासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सौर उर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या तीन एचपी क्षमतेच्या मोटारी चालणे शक्य होणार आहे. मात्र सौर उर्जा प्रकल्पाच्या आजूबाजूला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची स्थानिकांनी काळजी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा- अदर पूनावाला यांची घोषणा; लवकरच कोरोनावरील तिसरी लस येणार