अहमदनगर - प्रवरा मेडिकल ट्रस्ट सुमारे 10 कोटी रुपये खर्च करून नव्या संगणक प्रणालीच्या साहायाने सुरू केलेली हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल, असे मनोगत प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आज व्यक्त केले.
प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या नवीन डेटा सेंटरचे व नवीन सर्वसामावेशक संगणक प्रणालीचे उदघाट्न आज (दि. 14 जून) डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुवर्णाताई विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, प्रवरा आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एस. एन. जंगले, अधिष्ठाता डॉ. राजवीर भलवार, डॉ. हेमंत कुमार, कुलसचिव डॉ. संपत वाळुंज, पंजाबराव आहेर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी या नव्या संगणक प्रणालीमुळे प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा आरोग्य विद्यापीठ यांचे काम अधिक पारदर्शक होण्याबरोबर अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. या नवीन प्रणालीच्या आधारे येत्या 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणारी हेल्थकार्ड ही सिस्टीम प्रवरा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची आरोग्य पत्रिका असेल. ही नवीन प्रणाली म्हणजे प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या नव्या मैलाच्या प्रवासाची सुरवात आहे, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - भेंडा परिसरातल्या ऊस बेण्याला मोठी मागणी, रोज सुमारे ४०० टन ऊस विक्री