अहमदनगर - जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या आणि बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याशी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज(रविवार) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ऊस तोडणी कामगारांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यास ऊस तोडणी कामगारांसोबतच ऊस तोडणी वाहतूकदार, ऊस तोडणी मुकादम हेही सहभागी होणार असल्याचे आंबेडकर यांनी घोषित केलेले आहे.
यापूर्वी साखर कारखान्यांशी केलेले सर्व करार संपलेले असताना नवीन करार होत असून कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांना केंद्रीभूत ठेवून दर ठरवावेत. परस्पर कारखान्यांनी याबाबत निर्णय घेऊ नये, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज भगवान गडाच्या पायथ्याशी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
बीड-नगर या पट्ट्यामध्ये ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. आता ऊस गाळपाला सुरुवात होणार असल्याने या कामगारांच्या समस्या, त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न, त्याचबरोबर वाहतूकदार आणि मुकादम यांच्या मागण्या या सर्वांचा निपटारा साखर कारखानदारांनी आतापर्यंत कधीच केलेला नाही. साखर कारखानदार राजकारणात व्यस्त असून त्यांना दीनदुबळ्या ऊसतोडणी कामगारांची फिकीर नाही. साखर कारखानदारी तोट्यात दाखवून या माध्यमातून ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांना नागवण्याचे काम साखर कारखानदारांनी केले आहे. त्यामुळे आता ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांनी एकत्र येऊन या सर्वपक्षीय साखर कारखानदारांविरोधात आवाज उठवला पाहिजे, यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच घोषित केले आहे.
आज दसऱ्याच्या निमित्ताने भगवान गडावर मेळाव्यास परवानगी नसली तरी भगवान गडाच्या पायथ्याशी या सर्व कामगारांचा मेळावा घेऊन या प्रश्नावर सरकारने त्वरीत तोडगा काढावा. त्याशिवाय ऊस तोडणी कामगार वाहतूकदार आणि मुकादम हे ऊस तोडणीस उतरणार नाही, अशी भूमिका घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - भगवान गडावरील दसरा मेळावा यंदा रद्द..