अहमदनगर - प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी द्यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, शेतीच्या सर्व कामांचा समावेश मनरेगात करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, प्रहारच्या कार्यकर्त्यांना कलम 144 नुसार जमावबंदीचे कारण देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 500 मीटर अंतरावरच अडवण्यात आले.
आंदोलकांच्या इतर मागण्यांमध्ये दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ केले जावे, घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान दिले जावे, दुधाला हमीभाव मिळावा, दुधाचे पाच रुपये थकीत अनुदान त्वरित मिळावे आदींचा समावेश आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आपले निवेदन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास वाघ यांना दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.