अहमदनगर - शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित झाल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र संबंधित रुग्णालयाने ऑक्सिजन उपलब्ध होता, मात्र रुग्णाची परिस्थिती नाजूक होती त्यात हा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येत रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा करून रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली आहे.
हेही वाचा - पुण्यात कडक लॉकडाऊनची गरज नाही, न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणार - महापौर
ऑक्सिजन उपलब्ध न झालेला रुग्ण पोलीस कर्मचारी-
कोरोना उपचार सुरू असलेले पोलीस कर्मचारी हे दौंड पोलीस प्रशिक्षण केंद्रात सेवेत होते. 28 एप्रिलला त्यांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज शुक्रवारी पहाटे रुग्णाच्या नातेवाईकांना हॉस्पिटल प्रशासनाने ऑक्सिजन संपत असल्याचे सांगत सिलेंडर उपलब्ध करण्यास सांगितले. मात्र, नातेवाईकांना वेळेत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला नाही आणि दरम्यान ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध ठेवलेला नव्हता किंवा अगोदरच ऑक्सिजन उपलब्ध करून घ्या असे सांगितले नव्हते, ऐनवेळी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करा असे सांगितले असताना सिलेंडर रिफील केंद्रावर संबंधित रुग्णालयात रुग्ण संख्येनुसार मंजूर केलेले सिलेंडर रुग्णालयाने नेलेच नसल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याचे नातेवाईक यांनी सांगितले आहे.
पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असल्याचा रुग्णालयाचा दावा-
याबाबत रुग्णालयाच्या कोविड विभागाच्या प्रमुखांशी नातेवाईकांनी केलेल्या आरोपाबाबत माहिती घेतली असता रूग्णालयात पुरेसा ऑक्सिजन आहे. जर ऑक्सिजन साठा संपला असता तर इतरही रुग्ण दगावले असते असे सांगण्यात आले. रुग्ण 28 एप्रिल रोजी दाखल होते त्यावेळेसच त्यांची तब्येत खालावलेली होती. रक्तात साखरेचे प्रमाण वाढलेले होते आणि ऑक्सिजन लेवल कमी झालेली होती. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव शरीरात वाढल्यानं मृत्यू झाल्याचं स्पष्टीकरण रुग्णालयाच्यावतीने देण्यात आलं आहे.
पोलीस सेवेत फ्रंट वर्कर असतानाही सुविधा मिळत नाहीत-
मृत झालेली व्यक्ती दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होती. कोरोना काळात या दलाच्या जवानांना अनेक ठिकाणी बंदोबस्ताला जावे लागत आहे. त्यामुळे संपर्कातून कोरोनाचा धोका वाढलेला आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करत असताना कर्मचारी बाधित झाल्यास त्यांना उपचारात प्राधान्य मिळून सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र असे होताना दिसत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच संबंधित रुग्णालयाची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करण्यात येऊन त्यांचा अहवाल आल्यानंतर रुग्णालयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे नातेवाईक यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करते, हा आरोप आरोग्यमंत्र्यांनी खोडून काढला - प्रवीण दरेकर