अहमदनगर - प्रचंड वृक्षतोडीमुळे वातावरणाचा ऱहास होत आहे. सिमेंटचे बंगले-पैसा-सत्ता-चारचाकी गाड्या, या संपत्तीची गरज नसून ज्याच्याकडे अधिक वृक्ष तोच खरा श्रीमंत असणार आहे, कारण त्याला उत्तम आरोग्य मिळणार आहे. सदृढ आरोग्य हीच खरी श्रीमंती. यासाठी गावोगावी वृक्ष महोत्सव भरवले जाऊन समाजप्रबोधन होणे गरजेचे असल्याचे मत वृक्ष चळवळीला वाहून घेतलेले प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात वृक्ष चळवळीच्या विविध उपक्रमांसाठी आलेल्या सयाजी शिंदे यांनी अहमदनगर इथे पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना वरील मत व्यक्त केले. वृक्ष चळवळीच्या निमित्ताने सुरू केलेल्या देवराई चळवळीचे रूपांतर नव्या नावाने करत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. यासाठी ट्री स्टोरी फाउंडेशनची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. झाडांची गोष्ट या नावाने ही चळवळ आता ओळखली जाईल. समाजातील सजग घटकाने पर्यावरणाचे आणि पर्यायाने वृक्षांचे महत्व ओळखून स्वतःची छोटीशी रोपांची नर्सरी निर्माण करावी. ही रोपे लावून त्यांची तीन-चार वर्षे निगा राखत जतन केल्यास हेच जगलेले वृक्ष तुम्हाला आणि तुमच्या पुढील अनेक पिढ्यांना तीनशे ते पाचशे वर्षे जगवतील, असे सयाजी शिंदे म्हणाले. पैशाच्या बँके पेक्षा आता वृक्ष बँकेची गरज असल्याचे ते म्हणाले. नेते, पक्ष, चळवळी यांच्या मागे लागून प्रसिद्धी पेक्षा वृक्ष लागवडीची खरी चळवळ असून कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून आपण प्रत्यक्षातील कामावर भर देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाणी असणारा नगर जिल्हा उजाड का?
नगर जिल्ह्यात सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेतून अनेक वृक्ष लागवडीचे उपक्रम सुरू आहेत. याबाबतची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. संगमनेरच्या म्हस्के वाडी इथे तीन वर्षांपासून राबवलेल्या उपक्रमातून सहा हजार पाचशे सदृढ झाडे निर्माण होत आहेत. सायखिंडी इथे याच प्रकारे वीस हजार झाडे आकार घेत आहेत. जिल्ह्यातील पाच ते सात गावात या वर्षी वृक्ष चळवळ सुरू होत आहे. नगर शहरातील एका शाळेत प्रत्येक विद्यार्थी एका झाडाची जबाबदारी घेत आहे. संगमनेरच्या मिलिंद कानवडे यांनी पाच गावांत एका वन कल्चर वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेत आहेत. यात कुठे चिंच तर कुठे पेरु, जांभूळ या पद्धतीने एकाच प्रकारची झाडे त्या-त्या गावात लावली जाणार आहेत, अशी माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली. यावेळी शिंदे यांनी नगर जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता असताना अनेक गावे-डोंगर उजाड का? असा प्रश्न पडला असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील सजग घटकाने पुढे येऊन ट्री स्टोरी फाउंडेशनशी संपर्क साधावा आणि निसर्गाचे पर्यायाने मनुष्य जीवाचे रक्षण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.