शिर्डी - नववर्षाच्या सुरुवातीला देवदर्शनासाठी देश-विदेशातून आज लाखो भक्त शिर्डीत दर्शनासाठी दाखल झाले आहेत. भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी साई संस्थानच्या वतीने मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून वाढलेल्या भाविकांसाठी सोई सुविधांची पूर्तता करण्यात आल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी दक्षता घेण्यात आली आहे.
दर्शन बारीतील भाविकांसाठी रात्रभर मोफत चहा, बिस्कीटची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच व्हीआयपी दर्शनही रात्रभर सुरू असणार आहे.
वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक रिंग-रोडने वळवण्यात आली आहे.