अहमदनगर - लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश थांबला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून घरात राहून लोकेही कंटाळली. मात्र, याच वेळेचा सदुपयोग अहमदनगरच्या मांडवे गावातील ग्रामस्थांनी केला. या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवत गेल्या 50 वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम या दोन महिन्यांत स्वतः पूर्ण केले. विशेष म्हणजे या रस्त्याला 'कोरोना रोड' असे नावही देण्यात आले.
मांडवे ते लक्ष्मीवाडी हा दोन किलोमीटरचा रस्ता लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून तयार केला गेला. रस्त्याचे नाव आणि नागरिकांच्या या उपक्रमामुळे सध्या हे गाव आणि लक्ष्मीवाडी चर्चेत आली आहे.
कोरोना विषाणूने मोठ-मोठ्या शहरांत हाहाकार उडाला आहे. त्यामुळे, आज शहरी भागातील लोकांना घरात बसून राहावे लागत आहे. मात्र, त्याचवेळी ग्रामीण भागातील लोक शेतातील कामांसोबतच शासनाच्या नियमांचे पालन करत सामाजिक कार्यातही हातभार लावत आहेत. हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.