अहमदनरग - शिर्डी लोकसभा मतदार संघातील भाजप-सेना युती पदाधिकाऱ्यांची आज संगमनेर मतदार संघात बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री दादा भुसे यांच्या समोर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. केवळ भाषण न करता नियोजनावर भर द्या अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातुन विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, लोखंडेचा मतदार संघात संपर्क न राहिल्याने मतदारात आणि युतीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्याचे पडसाद आजच्या बैठकीत बघावयास मिळाले. खासदार दिसत नाही असा प्रश्न शिवसेनेचे संगमनेर पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांनी माडले. नंतर त्यांना दराडे यांनी बोलण्यापासून रोखले. यानंतर काही काळ बैठकीत कार्यकर्त्यानी गोंधळ घातला. या वेळी दादा भुसे यांनी लोखंडे महत्वाचे नाहीत धनुष्य बाण महत्वाचा असे सांगत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
या मेळाव्यात दादा भुसे यांनी आपल्या भाषणातुन जो विधानसभा मतदार संघ जास्त लीड देईल त्याला जास्त निधी दिला जाईल अशी घोषणा केली, वेळ पडली तर गट , गण नुसार निधी देऊ असही भुसे यांनी जाहीर केले. मुंबईत २६.११ ला झालेल्या हल्ल्याचे त्यावेळी आघाडी सरकारने कठोर पाऊल उचलले असते तर आजची वेळ आली नसती. मात्र, मोदींनी आपले ४२ जवान शहीद झाल्यानंतर शहिदांचे तेरावे अतिरेकी तळ उध्वस्त करून घातले. ४० ला चारशे घेतले. मात्र, यापुढे १ ला शंभर नाहीतर १ ला हजार असा बदला घेऊ. आता मोदी विरोधात ५६ पक्ष एकत्र आले पण त्यांचा अजेंडा काय तर मोदीला हटवा. विकास कामे हा अजेंडा नाही तर फक्त मोदी हटाव एवढे काय मोदींना घाबरले, असे वक्तव्य दादा भुसे यांचे केले.
शिवसेना भाजपची युती आहे. मात्र, शिर्डीत लोखंडे विरोधात शिवसेनेतुन निवडुण गेलेले माजी खासदार मात्र आता भाजपमध्ये असलेल्या भाऊसाहेब वाकचौरेंनी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी केली आहे. असे असताना भाजप त्यांच्यावर कार्यवाही का करत नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला असता शिर्डी मतदार संघाचे संपर्क प्रमु़ख दराडे यानी ते माघार घेतील, असे सांगीतले.