अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर कायम प्रेम केले असून पक्षनेतृत्वाने सातत्याने मोठा विश्वास टाकला आहे, असे म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मतदासंघातील लोकांचे आभार मानले. आगामी काळात जिल्ह्यामध्ये काम करताना निळवंडे धरणाचे काम ही आपली प्राथमिकता असून या धरणाच्या कालव्यांद्वारे लवकरात लवकर दुष्काळी भागाला पाणी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानून या निवडणुकीचे खरे 'मॅन ऑफ द मॅच' संजय राऊत असल्याचे ते म्हणाले.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात प्रथमच त्यांच्या पारंपरिक संगमनेर या मतदारसंघात आले होते. विविध सहकारी संस्था, सेवाभावी संस्था व सर्वपक्षीय तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचा आभार समारंभ आयोजित केला होता. यावेळी बोलताना, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वसामान्य माणसाचे हित जपणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेत अपयश आल्यानंतर काँग्रेसमधून अनेकांनी पक्षांतर केले. मात्र, अडचणीच्या काळात पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी दिल्याने आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सतत काम करत राहिल्याने काँग्रेसला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. आगामी काळात पक्ष संघटनेचे काम मजबूत करताना सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन थोरात यांनी केले.
संगमनेरमध्ये जंगी स्वागत
बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये येणार असल्याने विविध सहकारी संस्था, सेवाभावी संस्था व सर्वपक्षीय तरुण कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. जागोजागी अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते. थोरात यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व ढोल-ताशांचा गजर झाला. तसेच गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.