अहमदनगर - लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा इशारा पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला होता. आता त्यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यालयाचे कर्मचारी आणि तालुक्यातील तलाठ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा - रक्षाबंधन करून सासरी जात होती नवविवाहिता, अपघातात झाला मृत्यू
आज बुधवारपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, एक तर आमच्या तालुक्याबाहेर बदल्या करा अथवा तहसीलदारांची बदली करा, तो पर्यंत आम्ही काम सुरू करणार नाही, असा निर्वाणीचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, ही मागणी करताना कर्मचाऱ्यांना नेमका काय त्रास आहे, हे बोलण्यास धजावत नसून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आमचे गाऱ्हाणे, अडचणी मांडल्या आहेत, असे तालुका तहसील कर्मचारी संघटना आणि तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.
कामकाजावर परिणाम नाही -
बेमुदत कामबंद आंदोलनाने पारनेर तहसील कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले असले तरी याबाबत स्वतः तहसीलदार ज्योती देवरे यांनी याबाबत सांगताना काही कर्मचारी, तलाठी कुठलीही लेखी सूचना न देता कामावर हजर नसले तरी नायब तहसीलदार, अव्वल कारकून आदी कामावर हजर असून नागरिकांच्या कामाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ज्योती देवरे - लंके संघर्ष अप्रत्यक्ष सुरूच
पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके आणि तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी म्हणून संघर्ष तालुक्यात सर्वश्रुत आहे. वास्तविक हे दोघेही आरोप करताना थेट एकमेकांचे नाव घेत नाहीत, हे विशेष. लंके हे पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक असून त्यांचे नागरी समस्यांसाठी आक्रमक धोरण असते. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधितांना ते धारेवर धरून काम मार्गी लावतात. त्याच धर्तीवर तहसीलदार देवरे या त्यांच्या कार्यशैलीने काम करत असतात. यातून चूक - बरोबर हा विषय बाजूला पडून मतभेद वाढल्याने लंके यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आदी पातळीवर याची माहिती दिली आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही त्यांनी नागरी समस्यांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी कामातील अनियमितता यावर तक्रारी, आंदोलने केली आहेत. यातून गैरसमज वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात तहसीलदार देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देत व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर गेले आहे. अशात आता देवरे यांच्याच अखत्यारीतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारून देवरे यांच्या अडचणीत भर घातली आहे.
भाजपने केली देवरे यांची पाठराखण
भाजपच्या अनेक नेत्यांनी, महिला नेत्यांनी देवरे यांची बाजू घेत त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मंगळवारी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी त्यांची पारनेर इथे जाऊन भेट घेतली आणि पक्ष आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. एकूणच या प्रकरणाला काहीसे राजकीय वळण आलेले असून त्याचा परिणाम तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांवर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - वादग्रस्त वक्तव्याबाबत अहमदनगरमध्ये सेनेच्या तक्रारीवरुन राणेंच्याविरोधात गुन्हा दाखल