अहमदनगर - राज्यासह देशात सर्वत्र लाकडाऊन सुरू आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. म्हणूनच शेतकऱ्याला मदत व्हावी यासाठी एका पालकाने मदतीचा दुहेरी योग साधला आहे. शेतकऱ्यांविषयी आस्था असलेल्या एका व्यक्तीने मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल एक टन टरबूज खरेदी केली आणि ती जिल्ह्यातील अनाथ महिला-मुलांना स्नेहाचा आधार देणाऱ्या स्नेहालय संस्थेतील मुलांना दिली आहेत.
कोरोना पर्वात शेतकरी अडचणीत आला असताना त्याला मदतीचा हात मिळावा आणि मुलांनाही उन्हाळ्यात थंडगार फलाहार मिळावा या हेतून स्नेहालय परिवाराशी जोडलेल्या रोहित परदेशी यांनी ही भेट दिली. भेट दिलेले एक टन टरबूज स्नेहालय संस्था शहरातील इतर संस्थांना सुद्धा वाटणार आहे. या अनोख्या भेटी बद्दल स्नेहालय परिवाराणे परदेशी दांपत्याचे आभार मानले आहेत.