अहमदनगर - राहाता तालुक्यातील लोहारे येथे लिक्वीड अभावी बंद असलेल्या ऑक्सिजन प्लांटला आज दहा टन लिक्वीड उपलब्ध झाले. त्यामुळे याठिकाणी तातडीने ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे राहाता व कोपरगाव तालुक्यातील रूग्णांना संजीवनी मिळाली आहे.
लिक्विड मिळाल्याने ऑक्सिजन निर्मिती सुरू -
राहाता तालुक्यातील लोहारे येथील भाऊराव पोकळे या तरुणाने दोन वर्षे अविश्रांत मेहनत घेवून साईराज गॅसेस या नावाने ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याने प्रशासन व लोकप्रतिनीधींनी लक्ष घालून तातडीने या प्लांटला परवाना मिळवून दिला. मात्र, या प्लांटसाठी मेडीकल लिक्वीड ऑक्सिजन उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे हा प्लांट बंदच होता. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी राहाता, शिर्डी, कोपरगावा तालुक्यांत निर्माण झालेल्या ऑक्सिजन आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लिक्वीड ऑक्सिजन मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. आज गुजरातवरून एक दहा टनाचा टँकर उपलब्ध झाल्याने आता या प्लांटमध्ये ऑक्सिजन उत्पादन सुरू करण्यात आले आहे.
निर्माण झाली होती ऑक्सिजन आणीबाणी -
सध्या रुग्णालये व कोरोनाचे रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेशी झुंज देत आहेत. संगमनेर व सिन्नर तालुक्यातील प्लांटमधून ऑक्सिजन सिलिंडर मिळणे बंद झाल्याने चार दिवसांपासून राहाता व कोपरगाव तालुक्यात आणीबाणीची परिस्थीती निर्माण झाली होती. अनेक रुग्णालयांनी ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना अॅडमिट करून घेणे बंद केले होते. तर, उपचार सुरू असलेल्या रुग्णांनाही पर्यायी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसिलदार कुंदन हिरे यांनी धावपळ करून औरंगाबाद व नगरवरून काही सिलिंडर मिळवून रुग्णांना तात्पुरता दिलासा दिला होता.
या प्लांटमध्ये आजपासून ऑक्सिजन निर्मितीला सुरूवात झाल्याने आठवडाभर तरी दोन्ही तालुक्यांना ऑक्सिजन पुरवठा होवू शकतो. दरम्यान, आणखी लिक्वीड टँकर मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्लांटला आवश्यक तेवढे लिक्वीड उपलब्ध झाले तर उत्तर नगर जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागवू शकते.