अहमदनगर - आषाढी एकादशीनिमित्त नगर जिल्हा कारागृहात किर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कारागृहात टाळ-मृदुंगाचा गजर झाला. यामध्ये सर्व कैदी विठूमाऊलीच्या नामस्मरणात तसेच किर्तन ऐकण्यात तल्लीन झाले होते.
आषाढी एकादशीनिमित्त केवळ पंढरपूरच नव्हे तर अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. लाडक्या विठू माऊलीचा गजर विविध ठिकाणांहून कानी पडत आहे. याला अहमदनगरचे जिल्हा कारागृहसुद्धा अपवाद नाही. अमित महाराज धाडगे यांच्या किर्तनाने कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदीवानांना मोठी पर्वणीच मिळाली होती. विठूमाऊलीचे नाव ऐकताच सर्व कैदी देहभान विसरून किर्तनात तल्लीन झाले होते.
कारागृह चिंतागृह न राहता चिंतनगृह बनायला पाहिजे. चिंतनातून भक्तिमार्गाचा अवलंब केल्यास बंदीवान गुन्हेगारी मार्गावरून नक्कीच चांगल्या मार्गावर येतील, असे विश्वास यावेळी धाडगे महाराजांनी व्यक्त केला.