अहमदनगर- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यासंदर्भातला अविश्वास ठराव आज सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सर्व गटनेत्यांनी माने यांच्या कारभाराबद्दल आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांनी ठराव दाखल केला होता. ठरावाला सर्व सदस्यांनी माने यांच्या विरोधात हातवर करून अविश्वास ठराव मंजूर केला.
सीईओ माने यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश देण्यात आलेला असल्याने ते आज उपस्थित नव्हते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या उपस्थितीत सोमवारी विशेष सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष राज्यश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, उमेश परहर, अजय फटांगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेमध्ये माजी सैनिकाच्या पत्नीच्या बदलीचा विषय चांगलाच गाजला होता. सत्ताधारी विरुद्ध प्रशासन, असा संघर्ष या वेळेला मोठ्या प्रमाणावर उभा ठाकला होता. या बदली प्रकरणावरून वादंग निर्माण झाल्याने अखेरीस जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता व सदस्यांनीसुद्धा सभा त्याग केला होता. यानंतर विश्वजित माने यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घोषित केला होता.
आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेचे गटनेते अनिल काळे यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला. माने यांनी मनमानी पद्धतीने कारभार केला. सदस्यांशी ते कधीही व्यवस्थित बोलत नाहीत. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे विकास कामावर मोठा परिणाम झालेला आहे. सदस्यांचा अपमान त्यांनी केलेला आहे. त्यामुळे विश्वजीत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करावा, अशी मागणी करत सभागृहांमध्ये अविश्वासा ठराव दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कैलास वाकचौरे, क्रांतिकारी शेतकरी संघटनाचे सुनिल गडाख, हर्षद काकडे, जालिंदर वाकचौरे या सदस्यांनी ठरावास पाठिंबा दिला.