अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा हल्ला केला. पक्षाला राष्ट्रवादी नाव देऊन शरद पवार जनतेच्या डोळ्यात धुळ फेकत आहेत. पवार विदेशी चष्म्यातून भारताकडे पाहत आहेत. तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीने फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांनी केला.
वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच काम केले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाही. मात्र, शरद पवारांना नेमके झाले तरी काय? देशासाठी तुम्ही काँग्रेस सोडली आणि आता त्यांच्याशी हातमिळवणी केली, अशी टीका त्यांनी पवारांवर केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले असतानाही पवारांना झोप कशी येते? असा सवालही त्यांनी पवारांना केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे जम्मू-काश्मीरला भारतापोसून तोडणाऱ्यांच्या बरोबर असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशामध्ये २३ मे नंतर पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस सरकारच्या काळात देश कमजोर झाला. जगाने निर्णय न घेणारे सरकार पाहिले. तसेच मोदींनी दहा वर्षे सत्तेच्या काळात गुंगी सरकार म्हणून काँग्रेस पक्षाला हिणवले. भाजप सरकारने पाकिस्तानात घूसून अतिरेक्यांना मारण्याची परवानगी दिली. काँग्रेस सरकारच्या काळात देश कमजोर झाल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दल सांगितले. पुन्हा सत्तेत आल्यास शेतकरी कृषी योजनेत बदल करणार असल्याचे ते म्हणाले. ६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन देणार असल्याचेही ते म्हणाले. शेतकरी, पशुपालक, मत्सव्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांनी विशेष योजनांची घोषणा केली.