अहमदनगर - देशाला 240 लाख टन साखरेची गरज असताना 310 लाख टन साखर उत्पादन होत आहे. गरजेपेक्षा 70 लाख टन साखरेचे उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, बँका डबघाईला येतात आणि साखर कारखानदारी बंद पडण्याच्या परीस्थितीत आहे. हे चक्र थांबवायचे असेल तर आता साखरे ऐवजी इथेनॉल निर्मिती साखर कारखान्यांनी केली तरच शेतकरी आणि साखर कारखाने जगातील असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
चार हजार 72 कोटींच्या कामांचा शुभारंभ -
अहमदनगर जिल्ह्यासह निकटच्या जिल्ह्यातील चार महामार्गाच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आणि पूर्ण झालेल्या चार महामार्गांचा लोकार्पण सोहळा गडकरी यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती आज (शनिवार) झाला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भाषणात साखरेचे कडू चक्र विस्तृतपणे मांडताना साखर उद्योगाला उभारी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक दुष्टचक्र संपवण्यासाठी आता साखर कारखान्यांना साखरे ऐवजी पूर्णपणे इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे, यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
साखर नको, इथेनॉल निर्मिती करा -
केंद्र सरकारने इथेनॉल पंपांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सर्वप्रथम राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपल्या परिसरात इथेनॉल पंप सुरू केले पाहिजे. आपल्या भागातील सर्व वाहने हे इथेनॉलवर चालली पाहिजे. आज पेट्रोल 108 रुपयांवर पोहचले आहे तर इथेनॉल 65 रुपये लिटरने मिळत आहे. केंद्र सरकार पुढील पाच वर्षे उत्पादित झालेले सर्व इथेनॉल विकत घेण्याची हमी देत आहे. त्यामुळे केवळ ऊसच नव्हे तर तांदूळ, मका आदीपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळेल. अतिरिक्त उत्पादनामुळे शेतकरी आणि साखर कारखाने अडचणीतून बाहेर येतील असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
देश उभारणीत गडकरींचा वाटा - पवार
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांची मुक्तकंठाने स्तुती केली. लोकप्रतिनिधीच्या हातात ज्यावेळी सत्तेची सूत्रे येतात आणि त्यावेळी तो लोकप्रतिनिधी लोकहिताच्या दृष्टीने पक्षातीत जात काम करतो. त्यावेळी दृश्य परिणाम हे सकारात्मक असतात. गडकरी हे त्या हेतूने काम करत आले असल्याने राष्ट्र उभारणीत त्यांचे महत्वाचे योगदान असल्याचे पवार म्हणाले. गडकरी यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी काम घेऊन गेल्यावर निराश होत नाही. पक्षापेक्षा काम होणार असेल तर त्याला मदत करण्यावर गडकरी यांचा प्रयत्न असतो. हे अनेक ठिकाणी ऐकायला मिळते ही चांगली छबी गडकरी यांनी निर्माण केल्याचे पवार म्हणाले. केवळ राज्यातच नव्हे तर देशातील अनेक राज्यातील चांगले रस्ते यावर ज्यावेळी त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या सोबत चर्चा होते. त्यावेळी याचे श्रेय संबंधित गडकरी यांना देतात याचा उल्लेख पवार यांनी आपल्या भाषणात केला.
सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती -
कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे, आमदार रोहित पवार, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार बबनराव पाचपुते, आमदार किरण लहामटे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - शरद पवारांनी दिली आमदार लंकेंच्या घरी भेट; नगरमध्ये पवार, गडकरी एकाच मंचावर