अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (20 मे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुचवलेल्या कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोदींनी बोलण्याची संधी दिल्यानंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी केवळ जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या माहितीवर न थांबता हे सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियान; तसेच प्रत्येक टप्यावर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आदींनी सुचवलेल्या उपाययोजनांमुळे शक्य झाले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवता आली, असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री, मुख्य सचिवांकडून भोसलेंचे अभिनंदन
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट याची सांख्यिक माहिती दिली. पहिल्या लाटेतील एकूण रुग्णसंख्या ही दुसऱ्या लाटेत केवळ अडिच महिन्यात दुप्पटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाचा उपयोग झाला. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील वाढलेली रुग्णसंख्या कमी झाली, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले. त्यामुळे महाराष्ट्राची कोरोना बाबतची बाजू उत्कृष्ट मांडल्याबद्दल बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हाधिकारी भोसले यांचे फोन करून अभिनंदन केले.
आदर्श गाव हिवरे बाजारचा कोरोनामुक्ती पॅटर्न चर्चेत
नगर तालुक्यातील हिवरे बाजारची ओळख आदर्श गाव म्हणून आहे. या ठिकाणी काम करणारे आदर्श सरपंच आणि आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावात कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच प्रभावी उपाययोजना आखल्या. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ग्रामस्थांना बजावले. ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, ग्राम सुरक्षा दल, विविध सेवा सोसायटीचे सदस्य यांची चार पथके नेमली. या पथकांनी दिलेली विविध कामे जबाबदारीने पार पाडली. आरोग्य यंत्रणेने गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी केली. बाधितांना विलगीकरणात ठेवण्यात आले. गंभीर रुग्णांना नगरच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आले. बाधित कुटुंबांची शेतीची कामे, दुध काढून संकलनाची कामे विनाबाधित तरुणांनी वाटून घेतली. अत्यावश्यक कामाशिवाय कुणीच घराबाहेर पडले नाही. परिणामी एका महिन्याच्या आत संपूर्ण गाव कोरोनामुक्त झाले. हिवरे बाजारचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न जिल्हाभर राबवण्यात येत आहे. आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.
काल (20 मे) पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदर्शग्राम हिवरे बाजारचे उदाहरण मांडले. त्यामुळे विविध आदर्श योजनांमुळे नेहमीच चर्चेत असलेले हिवरे बाजार आणि पोपटराव पवार पुन्हा यानिमित्ताने चर्चेत आले आहेत.
रुग्णसंख्या वाढली तरी जिल्ह्यात मृत्यूदर कमी
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात 75 हजार रुग्ण होते. दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या अवघ्या अडिच महिन्यात दीड लाखापर्यंत पोहोचली. मात्र पहिल्या लाटेत रुग्ण कमी असताना मृत्यूदर दीड टक्के होता. तो दुसऱ्या लाटेत 0.9 टक्के आहे. अनेक गावात घरोघरी तपासणी केली. त्यात सुप्त अवस्थेतेतील 30 टक्के रुग्ण शोधण्यात आले. टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या. त्यामुळे रुग्णसंख्या जास्त दिसली. मात्र, प्राथमिक अवस्थेत रुग्ण शोधता आल्याने मृत्यूदर कमी असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या अडिच महिन्यात तब्बल पाच लाख कोरोना तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. गृह विलगीकरण न करता रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच ठेवण्यावर भर दिला. त्यासाठी 20 हजारावर खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असेही भोसले यांनी म्हटले.
हेही वाचा - ‘शोले’ मधील सांबा म्हणजेच मॅक मोहनच्या मुलींचे 'स्केटर गर्ल'मधून बॉलिवूड-पदार्पण !