अहमदनगर : रत्नागिरी येथील शशिकांत वारीसे हे कर्तव्यदक्ष कार्यक्षम पत्रकार होते. त्यांच्या मृत्यूमध्ये खुनाच्या संशयाला वाव आहे. पोलीस अधीक्षकांशी माझे याबाबत बोलणे झाले. वारसे यांना व्यक्तिगत 51 हजार रुपयांची मदत करत असल्याचे उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पत्रकारांवर होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी अजून काय करता येईल याबाबत चर्चा करून सरकारकडे उपाययोजनेसाठी आग्रह धरण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
निराधार पाल्याना शिर्डी संस्थाने मदतीचा हात द्यावा : साई संस्थानकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आणि कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सोयी सुविधा उपलब्धकरून द्याव्यात अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. कोविड काळात आई-वडील असे दोघेही दगावल्याने अनेक मुले निराधार झाली आहे. राज्यात विविध कारणांमुळे पंचवीस ते तीस हजार निराधार मुले आहेत. याची सर्व आकडेवारी उपलब्ध आहे. त्यादृष्टीने साई संस्थानने मदतीसाठी पावले उचलावीत. संस्थानने अनेक समाजपयोगी कामात यापूर्वीही सकारात्मकता दाखवलेली आहे असेही नीलम गोर्हे म्हणाल्या.
तुळजाभवानी मंदिरात महिलांना प्रवेश द्या : तुळजापूर येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये महिला पुजाऱ्यांना देखील गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करण्यासंदर्भात संस्थांच्या अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळांनी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. भवानी मातेच्या मंदिरात नियमांची अनिश्चितता असल्याचे सांगत असताना आपल्याला गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना अडवले गेले. काही मंत्र्यांना आतमध्ये सोडले जाते असे देखील गोऱ्हे यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आपण अवगत करणार आहोत. अनेक वेळा असा प्रसंग घडतो की, परंपरेने मान असणाऱ्या कुटुंबांना गाभाऱ्यात जाण्यास अडवण्यात येते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कोशियारी यांचा कार्यकाळ निराशाजनक : राज्यपालांच्या वक्तव्यामुळे अनेक वेळेस लोकप्रतिनिधींची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली होती. त्यांच्या अनेक वक्तव्यामुळे महापुरुषांबद्दल अनेक वेळेस निराधार आणि निंदनीय वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या अनेक कृतींमुळे राज्यातल्या जनतेचा अपेक्षा भंग झाला असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.