अहमदनगर - विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील नेवासा मतदार संघातील शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे नेते माजी आमदार शंकरराव गडाख हे निवडणूक लढवत आहेत. गडाख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार उभा न करता गडाख यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीनेही गडाख यांना पाठिंबा देऊन पवार व गडाख कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध घट्ट असल्याचे दाखवून दिले. यामुळे गडाख यांच्या पंखात बळ आले आहे. तर गडाख यांच्या विरोधात भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे आव्हान आहे.
हेही वाचा - चंद्रशेखर बावनकुळेंची ऊर्जा कुणी अन् का काढून घेतली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले व शंकरराव गडाख यांचेही मैत्रीचे संबंध आहेत. तेही संबंध येथे कामी आले आहेत. घुले यांनी यापूर्वीच निवडणूक न लढण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे पक्ष सांगेन ती भूमिका घेण्यास ते तयार होते. पक्षाने गडाखांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे नेवासे विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा स्वतंत्र उमेदवार राहणार नाही. त्यात गडाख यांनीही शुक्रवारी बोलताना घुले यांची आपल्याला साथ असल्याचे सांगून गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे घुले कुटुंबियांची साथ गडाख यांना मोलाची ठरणार आहे. तर नेवासे मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब मुरकुटे आणि शंकर गडाख यांच्यामध्ये चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे.