हैदराबाद - कवठेमहांकाळच्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने दिवंगत आर. आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील ( RR Patil Son Rohit Patil ) यांच्या नेतृत्त्वात एकहाती सत्ता मिळवली. याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( NCP MLA Rohit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रोहितचं वय कमी आहे. तसेच त्याठिकाणी अनेक गटतट होते. ते सर्व रोहितच्या विरोधात होते. अशी परिस्थिती असताना रोहित पाटलांनी तिथे विजय खेचून आणला. अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याला शाबासकी आपण दिली पाहिजे. लोकांनी पण विश्वास टाकलेला आहे. रोहित हा कष्ट करणारा व्यक्ती आहे. येत्या काळात तो अशाच पद्धतीने काम करत राहिला, पक्षाने त्याच्याकडे एखादी जबाबदारी, एखादं पद देण्याचा विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. ( NCP MLA Rohit Pawar on Rohit Patil )
नुकताच नगरपंचायती निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये राज्यातील लक्षवेधी नगरपंचायंतीपैकी एक जिथे दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यापैकी एक म्हणजे कर्जत-जामखेड नगरपंचायत. याठिकाणी राष्टवादीने दणदणीत विजय मिळवला. 17 जागांपैकी राष्ट्रवादीने 13 आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. तर भाजपला दोन जागा मिळाल्या. निवडणुकीच्या या निकालानंतर ईटीव्ही भारतने कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार ( Karjat Jamkhed MLA Rohit Pawar On ETV Bharat ) यांच्याशी संवाद साधला.
- प्रश्न - भाजपचे दिग्गज नेत्यापैंकी एक राम शिंदेंसारखे नेते असतानाही तुम्ही विजय पटकावला. याठिकाणी तुमची दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, असे कोणते मुद्दे होते, जे घेऊन तुम्ही लोकांसमोर गेलात आणि ज्यामुळे तुम्हाला लोकांनी साथ दिली?
उत्तर - मागील दोन वर्षांपासून लोकांना सोबत घेऊन काम करतोय. लोकांनी या सर्व गोष्ट पाहिल्यामुळे याबरोबरच तेथील उमेदवार, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मनापासून तिथे काम केले. आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. लोकांशी चर्चा केली आणि यामुळे लोकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही दोघं एकत्रित लढल्यामुळे त्यात 15 जागा आम्ही जिंकल्या. विश्वास असल्यामुळे जनतेने आम्हाला निवडून दिले.
- प्रश्न - जी आश्वासने घेऊन तुम्ही लोकांसमोर गेलात, अशी कोणती कामे आहेत, जी आता करायची बाकी आहेत?
उत्तर - रस्ते, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे यासांरखे मूलभूत कामे आहेत. त्याचबरोबर भूमीगत गटार योजना यासांरखे विषयांवर येत्या काळात काम करायचे आहे. यासोबतच शिक्षण, करिअर मार्गदर्शन, महिला सुरक्षा विषयावर काम करायचे आहे. अंगणवाडीमध्ये शिकवायची पद्धतीमध्ये सुधारणा आणायची आहे. यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, बचत गट यासारखे मूलभूत आणि सॉफ्ट विषय जे महत्त्वाचे आहेत, त्यासाठी काम करायचे आहे.
- प्रश्न - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून तुम्ही राज्य स्तरावर एकत्र आलात. मात्र, हाच धागा पकडून तुम्ही स्थानिक पातळीवर एकत्र का नाही आलात? या आघाडीचा स्थानिक पातळीवर तुम्हाला त्याचा फायदा झाला असता, असं नाही वाटत?
उत्तर - महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील नेत्यांनी जर त्या नगर पंचायतमध्ये, त्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यात स्थानिक परिस्थिती पाहून लढायचं असं ठरवलं होतं. माझ्या मतदार संघात आणि विशेष म्हणजे कर्जत शहरात भाजपची ताकद जास्त होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. हे नगरपंचायतीची निवडणूक होती. उमेदवार लढत असताना आमदाराचे कार्य महत्त्वाचं असलं तरी उमेदवार कोण हेदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे याठिकाणी काम करत असताना आपण वेगळी भूमिका घेतली. पण काही अशाही नगरपंचायती आहेत, जिथे आपण एकत्र लढलो. त्यामुळे एकूण कामगिरीचा आढावा जर घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली. गेल्या पाच वर्षांपूर्वीचा नगरपंचायतीची सत्ता जर पाहिली तर त्यामध्ये काँग्रेस दोन नंबरवर, भाजप तीन नंबरवर आणि शिवसेना आहे. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांमध्ये बढत झाली आहे. यांचा स्ट्राईक रेटही चांगला आहे.
- प्रश्न - नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोन नावांची चर्चा होती ती म्हणजे रोहित पवार आणि दिवंगत आर. आर. आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील. रोहित पाटील यांच्या कामगिरीनंतर त्यांच्यासाठी आमदारकीची दारे उघडी झाली आहे असं वाटतं का?
उत्तर - रोहितचं वय कमी आहे. तसेच त्याठिकाणी अनेक गटतट होते. ते सर्व रोहितच्या विरोधात होते. अशी परिस्थिती असताना रोहित पाटलांनी तिथे विजय खेचून आणला. अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याला शाबासकी आपण दिली पाहिजे. लोकांनी पण विश्वास टाकलेला आहे. रोहित हा कष्ट करणारा व्यक्ती आहे. येत्या काळात तो अशाच पद्धतीने काम करत राहिला, पक्षाने त्याच्याकडे एखादी जबाबदारी, एखादं पद देण्याचा विचार करावा. अशाप्रकारे युवकांना पक्षाने संधी दिली तर येत्याकाळात मोठा बदल आपण हा आपल्या पक्षात झालेला पाहू..
- प्रश्न - रोहितजी, तुमच्या कामाचं कौतुक सुप्रिया सुळेंनीही केलंय. तुमच्याकडे पवार घराण्यातील राजकारणाचं भविष्य म्हणून पाहिलं जातं. याकडे तुम्ही कसं पाहता?
उत्तर - माझ्याकडे भविष्य म्हणून पाहिलं जातं की नाही याकडे मी लक्ष देत नाही. पवार घराण्यात कष्ट करण्याला महत्त्व दिलं जातं. आम्हाला सर्वांना कष्ट करावे लागतात. कष्ट करत असताना आपली विचारसरणी ज्याप्रमाणे आपण समाजात असताना लोकांमध्ये गेल्यावर वागतो, लोकांचे प्रश्न ज्याप्रमाणे ऐकतो, त्यासर्व गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात. अशा परिस्थितीत कष्ट करत असताना पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारेन. आम्ही पदाकडे न पाहता, लोकांकडे पाहून काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे मतदारसंघामध्ये अनेक असे विषय आहेत जे मॉडेल बनू शकतात. हे सर्व पाहिल्यानंतर माझा विश्वास आहे, ज्या-ज्या गोष्टी मी मतदारसंघात करतो, इतर लोकांनीही त्या स्वीकाराव्यात. मॉडेल मतदारसंघ म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघ बनावा, यासाठी काम करत राहीन.
- प्रश्न - तुम्ही बारामतीचे. मात्र, कर्जत-जामखेड मतदारसंघ निवडण्यामागे काय कारण होते? तुमची काय भूमिका होती?
उत्तर - महाराष्ट्राची लोक प्रेमळ आहेत. पण जि.प. सदस्य असताना ज्याठिकाणी लोकांचं प्रेम आपल्याला मिळेल, ज्याठिकाणी कामाचा अनुशेष असेल, तर त्याठिकाणी आपल्याला संधी मिळाल्यावर कामं आपल्याला करता येतील. लोकांना विकास काय आहे, तो त्याठिकाणी त्यांना दाखवता येईल. या मतदारसंघात बरीच कामे प्रलंबित होती. चॅलेजिंग मतदारसंघ होता. एक मंत्री तिथे माझ्याविरोधात होते. अशा परिस्थितीत लोकांकडे पाहून एक मॉडेल निर्माण करत या हेतूतून सोपे मतदारसंघ सोडून याठिकाणी कर्जत-जामखेडमध्ये आलो. इथल्या लोकांनी प्रेम, आशिर्वाद दाखविला. त्यांच्या कृपेने मी इथे निवडूनही आलो. त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच विकासकामे करत आहे.
- प्रश्न - तुमच्या पिढीतील भावी मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुमच्या व्यतिरिक्त आणखी कुणाला तुम्ही सक्षम मानता. तुमच्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील कुणाची नावं तुमच्या डोळ्यासमोर येतात.
उत्तर - आता याबद्दल भाष्य करणं योग्य ठरणार नाही. सगळेच नवीन आमदार आहेत. पहिलीच वेळ याठिकाणी आहे. नविन वेळ आहे. त्यांसारखेच मीदेखील प्रयत्न करत आहोत. अनुभव हा टप्प्याटप्याने त्याठिकाणी मिळत असतो. सुरुवातीलाच एखाद्याला Judge करणं योग्य नसतं. पण एक तुम्हाला सांगतो, युवा आमदार निवडून आलेत. सगळेजण आपापल्या मतदारसंघात नवनवीन प्रयोग राबवत आहेत. एकाच निवडणुकीत सर्व बाबाी लक्षात येत नसतात. आपल्याला दुसऱ्यांदा निवडणूक त्याठिकाणी लढावी लागते. नवीन आमदारांमध्ये क्षमता आहे. हळूहळू त्यांनी Groom केलं आणि पक्षाने त्यांना साथ दिली, ताकद दिली तर नवीन नेतृत्त्व ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये पुढे येताना आपण पाहू शकतो.
- प्रश्न - गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवताय. आगामी काळात महाराष्ट्रात असं राष्ट्रीय पक्षांना सोडून तुम्ही एकत्र याल का?
उत्तर - महाराष्ट्रात काँग्रेसला सोडून होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेसला विश्वासात घ्यावं लागेल. गोव्यात जे समीकरण बसलं नाही, याचं आश्चर्य वाटतं. पुढच्या काही दिवसांत हे समीकरण बसूही शकतं. मला असं वाटतं की, भाजप मोठा पक्ष आहे. आर्थिक दृष्टीकोनातूनही मोठा पक्ष आहे. केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळे त्यांच्याकडे ईडी सीबीआयसारखे राजकीय हत्यार आहे. त्यामुळे जर कुणाला त्रास द्यायचा असेल तर ते देऊ शकतात. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या पक्षाविरोधात लढताना जनतेचा विश्वास संपादित करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्यात एकता असणं तितकंच महत्त्वाचं आहे. यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लोकांच्या बाजूने जर निवडणूक लढवली तर निश्चितच आपल्याला यश मिळू शकते. अनेकदा भाजपची ताकद नसताना मित्रपक्ष वेगवेगळे लढतात आणि मतामध्ये विभाजन होतं. त्याचा फायदा भाजपला होतो. असं घडू नये म्हणून याबाबतीत सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. काही पक्षांना एक पाऊल पुढे जावं लागेल, तर काही पक्षांना एक पाऊल मागं यावे लागेल, पण पुढे मागे जाऊन एकत्रित जर त्याठिकाणी आपण आलो तर नक्कीच भाजपसारख्या शक्तिशाली पक्षासमोर आपण टिकू शकतो. लढू शकतो. जिंकू शकतो.
- प्रश्न - तुमचे बंधू पार्थ पवार यांच्याबद्दल काय सांगाल.
उत्तर - आपापल्या परीने तो त्याठिकाणी कष्ट करत असतो. लोकांना भेटत असतो आणि त्याला ज्याठिकाणी जायचंय खासदारकी, तर निवडणुकीला अजून अडीच वर्ष बाकी आहेत. त्यासाठी तो मेहनत करत आहे. पहिल्यांदा मोदी लाट असल्यामुळे त्याला हार स्विकारावी लागली. येत्या काळात चांगलं काम करेल, लोकांमध्ये आणखी जास्त जाईल, संपर्क वाढवेल, कार्यकर्त्यांना विश्वास देईल, त्यावेळी कष्ट करुन खासदारकीच्या निवडणुकीत तो निवडून येईल. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे समीकरण काय असतील हे त्यावेळी पाहावं लागेल. मात्र, तरीसुद्धा तो त्याठिकाणी कष्ट करुन निवडून येईल आणि त्याला निवडून आणण्यासाठी माझ्यासारखी अनेक लोक जशी मागच्यावेळी सोबत होती, ती यावेळीही सोबत राहतील.