अहमदनगर - नगर-मनमाड या मार्गाची अवस्था अतिशय भीषण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डयांकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या झालेल्या या रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात विखे पाटील यांनी थेट सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना रस्त्याच्या परिस्थितीचे फोटो आणि एक व्हिडीओ सीडी पत्रासोबत पाठवली आहे. याद्वारे रस्त्याच्या दुरवस्थेकडे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षाबाबत लक्ष वेधण्यात आले आहे. नगर-मनमाड हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील वाहतूक या रस्त्यावरून सुरू असते. परंतु, नुकत्याच झालेल्या पावसाने या मार्गावर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. खड्डयांकडे स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना रस्त्यांच्या कामासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे. असे असतानाही शिर्डी विधानसभा मतदार संघातून जाणारा नगर-मनमाड राज्य मार्गाच्या कामाची निविदा मंजूर असतानाही रस्त्याच्या कामाला कुठलाही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
नगर मनमाड रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वी आपण विभागातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र दिले. पण, रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही, हे दुर्दैव आहे. प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा कळत असेल, तर आता कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी नगर-मनमाड मार्गावर रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा विखे पाटील यांनी पत्राद्वारे दिला आहे.
हेही वाचा- अतिक्रमण करुन इमारती बांधल्याने शिर्डी शहराची ही अवस्था - राधाकृष्ण विखे-पाटील