अहमदनगर - जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 81 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 73 रुग्णांना सध्या शहरातील खासगी रुग्णालयात तर आठ रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होते. पैकी खासगी रुग्णालयातील एक तर शासकीय रुग्णालयातील दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिस आजाराचे रोज नवीन रुग्ण आढळत असून त्यांच्यावर नगर शहरातील जिल्हा शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोर्गे यांनी दिली आहे.
लक्षणे दिसतात तज्ज्ञांकडून उपचार सुरू करा
राज्यात कोरोनातुन बऱ्या झालेल्या काही मधुमेहीमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येत आहेत. 73 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या रुग्णालयांकडून महापालिकेला दैनंदिन अहवाल प्राप्त होत आहे. प्राथमिक लक्षणे दिसतात डॉक्टरांशी संपर्क करून चाचण्या करून उपचार सुरू करावेत असे डॉ.अनिल बोर्गे यांनी सांगितले आहे.
खर्चिक उपचार आणि औषधांची कमतरता
कोरोना होऊन गेलेल्या मधुमेहींनी अधिक काळजी घेतली पाहिजे. म्युकरमायकोसिस आजार हा खर्चिक असून उपचारासाठी लागणारी औषधे आणि इंजेक्शन्सची मागणी शासनाकडे केली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले आहे.