अहमदनगर- भाजपचे खासदार विखे-पाटील यांनी नगर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीला खोडा घातला आहे, असा आरोप करत मनसे काटवन खंडोबा रोडला खासदार डॉ. सुजय विखे पाटील मार्ग, असे नामकरण करत रास्तारोको आंदोलन केले.
शहरातील आयुर्वेदिक कॉलेज चौकातून काटवन खंडोबाकडे रोडवर मनसे पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. काटवन खंडोबाकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. महापालिकेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 15 लाख रुपये मंजूर केले होते. काही नगरसेवकांनी खासदार निधीतून हा रस्ता होईल, असे सांगितले. त्यानुसार आयुक्तांनी प्रस्ताव तयार केला. त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले. पण, दोन वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. आठ दिवसांमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीवर कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईलने खासदार विखे पाटील व महापालिका आयुक्त यांच्याविरुद्ध मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा मनसेकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा - सरकारी अनास्था.. सहा वर्षापासून निवृत्तीवेतन न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली इच्छा मरणाची परवानगी