अहमदनगर - भाजपचे माजी मंत्री राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मतदारसंघात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची मिरवणूक आणि सत्काराचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत कर्जत येथे पार पडला.
विधानपरिषद निवडणुकानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले असल्याचे सांगत, यानंतरही आता फक्त भाजप नेत्यांचे दावे पाहिल्यावर भारतीय जनता पक्ष आता फक्त दावा करणारा पक्ष राहिला असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडीने आपली ताकद त्यांना आता दाखवली आहे, असेही ते म्हणाले.
सरकार, महाराष्ट्र पोलीस आणि जनतेच्या भावनेविरुद्ध बोलून भाजपने आपल्या शब्दाची किंमत कमी करून घेतली आहे, आता फक्त खोटे दावे करून ते जनतेची दिशाभूल करू शकत नाही. केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे पैसे देत नसताना राज्य सरकारची कामगिरी ही चांगली राहिली असल्याने येणाऱ्या काळातही होणाऱ्या निवडणुकात महाविकास आघाडी यश संपादन करेल, असा दावा आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला.
भाजपच्या किल्यात राष्ट्रवादीला यश -
कर्जत-जामखेड म्हणजे भाजपचा गड मानला जात होता. तत्कालीन काळात भाजपमध्ये असलेले खासदार सदाशिव लोखंडे यांच्यानंतर प्रा. राम शिंदे यांनी हा गड शाबूत ठेवला होता. ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद गट हे सर्व भाजपच्या ताब्यात होते. मात्र २०१९ ला आमदार रोहित पवार यांचे मतदारसंघात आगमन झाले आणि भाजपचा गड राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेला. आता ग्रामपंचायत निवडणुकात थेट राम शिंदेंच्या मूळ गावात शिंदेंना पराभवाचा मोठा झटका राष्ट्रवादीने दिला आहे. चौंडी आणि खर्डा या ग्रामपंचायतीमधील पराभव हे राम शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे बोलले जात आहे.