अहमदनगर - पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने भाळवणी येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये प्लाझ्मा डोनेट कँम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पन्नासवर अधिक लोकांनी प्लाझ्मा दान करत उस्त्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
विविध जिल्ह्यातील लोकांचा सहभाग -
लंके यांना प्लाझ्मासाठी अनेक गंभीर असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन येत होते. यातून त्यांनी कोरोना होऊन बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करा आणि तीन जीव वाचवून पुण्य कमवा अशी भावनिक हाक दिली. सोशल मीडियात त्यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्लाझ्मा डोनेट कॅम्पला पन्नासवर व्यक्तींनी प्लाझ्मा दान करून प्रतिसाद दिला. या कॅम्पला नगर जिल्ह्यासह पुणे, नाशिक, ठाणे आदी जिल्ह्यातून कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान केले. या कोविड सेंटरमधील हा दुसरा प्लाझ्मा डोनेट कॅम्प आहे. या पुढेही रक्तदान, प्लाझ्मा दान शिबिर आयोजित केले जातील. त्यात नागरिकांनी सहभाग नोंदवून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, आमदार लंके यांच्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये 1100 रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. यात 100 ऑक्सिजन खाटांची व्यवस्था आहे. आतापर्यंत 2200च्यावर रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतर अठ्ठावीस दिवसांनी कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतात.
हेही वाचा - इथे कोरोनाला कोणीच घाबरत नाही? मालेगावकरांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन
लंकेच्या कामाचे सर्वत्र कौतुक -
कोरोनाच्या कठीण काळात वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालये कमी पडत आहेत. रुग्णांना उपचारासाठी तर अनेकांना ऑक्सिजन-व्हेंटिलेटर खाटा मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या जम्बो कोविड सेंटरमुळे त्यांचे कौतुक होत आहे. या कोविड सेंटरमध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचारासोबतच आनंदी वातावरण, स्वादिष्ट आणि पोषक आहार, करमणुकीची साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यांच्या सुरू केलेल्या या कोविड सेंटरची राज्यभर चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच समाजसेवक अण्णा हजारे, आदर्शग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आमदरा लंकेच्या कार्याचे कौतुक केले आहे.
हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट : पाहा कोणकोणत्या राज्यांनी केलंय पूर्णपणे लॉकडाऊन