अहमदनगर - नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले असून याबाबत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या पेजवरून कोणतीही पोस्ट आल्यास ती ग्राह्य धरू नये, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आलेले युवा आमदार तसेच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे सोशल मीडिया अकाऊंट अडचणीत आले आहे.
या अकाऊंटवरून ते सतत लोकांपर्यंत उपक्रम पोहोचवत होते. मात्र आता फेसबुक पेज हॅक झाल्यामुळे कार्यकर्त्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. मंत्र्यांचे सोशल मीडिया पेज हॅक होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वीही कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे बनावट ट्विटर अकाऊंट बनवण्यात आले होते. त्यांनीही पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती.
सायबर क्राइम ब्राँच याचा तपास करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हे सर्वाधिक वाढल्याचे गृहमंत्रालयाच्या अहवालात समोर आले आहे.