अहमदनगर - केंद्राकडून वीज वितरणाच्या खाजगीकरणाची चर्चा दबक्या आवाजात सुरू असल्याचे ऐकतोय, असे झाले तर जुलमी वसुली सुरू होईल आणि आधीच अडचणीत असलेला राज्यातील शेतकरी मोडीत निघेल, अशी भीती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातील विजेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना वीज वितरणाच्या संभाव्य खाजगीकरणावर आपले मत व्यक्त केले.
तुमचेही बॅलन्सशीट आम्ही चेक करू -
भाजप खासदार सुजय विखेंसह भाजपच्या नेत्यांनी नुकतेच एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी खा.विखे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सध्या पालकमंत्री जिल्ह्यात किती पैसे आले आणि कुठे गेले याचे बॅलन्सशीट चेक करत आहेत, असा आरोप केला होता. यावर बोलताना तनपुरे यांनी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना आता शांत झोप लागतेय, त्यामुळे त्यांना अशी खुमखुमी वाटत आहे. मात्र आम्हीही तुमचे बॅलन्सशीट चेक करू. हसन मुश्रीफ यांच्या सारख्या जेष्ठ नेत्यांवर अशी टीका आणि आरोप करणे कितपत योग्य आहे, असा प्रतिप्रश्नही तनपुरे यांनी खा.विखेंना केला.
विखेंच्या उपोषण आंदोलनाची खिल्ली उडवताना, सकाळी नाश्ता करून आले आणि संध्याकाळी जेवायला घरी गेले, हे कसले उपोषण अशी कोपरखळी तनपुरे यांनी यावेळी मारली. मी सुद्धा उपोषण आंदोलने केली. पण राहुरी तालुक्यातील विविध प्रश्नांवर दिवस-रात्र उपोषण आंदोलन केली. पावसात उपाशी भिजत राहिलो, पण आंदोलनाचा स्टंट म्हणून वापर न करता जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रश्न सुटेपर्यंत उपाशी राहिलो. विखेंचे उपोषण म्हणजे एक स्टंट होता. खाऊन आले आणि काही तासानंतर जेवायला गेले असे तनपुरे म्हणाले.
हे ही वाचा - 'पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत की ज्यांना कोणी विचारत नाही' - मंत्री छगन भुजबळ
नगर तालुक्यातील विजेचे सर्व प्रश्न लवकरच सुटतील -
नगर तालुक्यात अनेक वर्षे वीज वितरणाचे पायाभूत प्रश्न रखडले गेल्याने अडचणी आहेत. मात्र आता मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी पण आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण माहिती घेऊन सबस्टेशन, फिडर, ट्रान्सफॉर्मर या सर्व पातळ्यांवर कामांचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नगर तालुक्यातील सर्व विजेचे प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी ग्वाही तनपुरे यांनी देताना या नगर तालुक्यावर वर्चस्व असलेले माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यावर राजकीय निशाणा साधला.