अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील आमदार निलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. लंके यांच्या अत्याधुनिक अशा जम्बो कोविड सेंटरचे यावेळी त्यांनी कौतुक केले. लंके यांच्या कोविड सेंटर जवळच टाकली ढोकेश्वर इथे स्थानिक एका भाजप नेत्याने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ केल्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, देशात भाजपचे नेतृत्व कोविडचा मुकाबला करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत गोमूत्र प्या, यज्ञ करा अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी करत असल्याचे सांगितले.
खासदार लोखंडेंच्या आक्षेपाला पाटलांनी दिली बगल-
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या निळवंडे धरणाच्या पाहणी दौऱ्यावर शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोविड पार्श्वभूमीवर आक्षेप घेतला होता. याबद्दल त्यांना विचारले असता, पाटील यांनी या भागातील लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात आणि प्राजक्त तनपुरे यांनाच फक्त कल्पना दिली होती. त्यांच्या उपस्थितीत निळवंडेच्या कामाची पाहणी केली, असे उत्तर देत लोखंडे यांच्या आक्षेपाला उत्तर देण्याचे टाळले.
राज्यपालांनी लोकशाहीची बुज राखावी-
सरकारने विधानपरिषदेसाठी बारा नावे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव घेऊन राज्यपालांकडे पाठवली आहे. मात्र अनेकदिवस उलटले तरी राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिलेली नाही. आता उच्च न्यायालयाने याबाबत विचारणा केली आहे. तर माहिती अधिकारात ही नावे राज्यपालांकडे पोहचली नाहीत, असे सांगण्यात येत आहेत. याबद्दल जयंत पाटील यांना विचारले असता, हा देश बाबासाहेबांनी लिहलेल्या घटनेवर चालतो. लोकशाही पद्धतीने सत्तेवर आलेले हे सरकार आहे. या परस्थितीत लोकशाहीची बुज राखली गेली पाहिजे, दुर्दैवाने सध्या ते दिसत नसल्याचं म्हणाले.
लसनिर्मिती कंपन्यांना केंद्राने मदत केली नाही-
अमेरिकेसारख्या अनेक देशांनी तेथील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत करून लस निर्मिती क्षमतेसाठी पुढाकार घेतला. भारतात मात्र केंद्र सरकारने या कडे दुर्लक्ष केले, उलट इतर देशांना सहा कोटींच्यावर लसी पाठवण्यात आला. आता परस्थिती बिकट झाल्यावर मदत केली जात आहे. मात्र यामुळे देशात सगळ्याच ठिकाणी लसींचा पुरवठा कमी असल्याची टीका जयंत पाटलांनी केंद्र सरकरवर केली. त्याच बरोबर कुंभमेळ्याचे आयोजन केल्याने उत्तरप्रदेशात रुग्णसंख्या ही प्रचंड झाली, परिणामी स्मशानभूमी कमी पडत असल्याने अनेक मृतदेह गंगेत पाहायला मिळाल्याचे ते म्हणाले.