अहमदनगर - गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या काकड आणि मध्यान आरतीला हजेरी लावली. मान्सून समाधानकारक व्हावा, ही साई चरणी प्रार्थना करत आगामी अर्थसंकल्पात शिर्डी झिरो क्राईम सिटी करण्यावर भर देणार असल्याचा आराखडा तयार करत असल्याचे केसरकरांनी सांगितले.
शिर्डी दौऱ्यात आज केसरकर यांनी शिर्डीत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि साई संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. आज झालेल्या बैठकीत शिर्डी शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या योजनेवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. यावर एक आराखडा तयार करून तो मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
राज्यात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. जिल्ह्याचे विभाजन करण्याची चर्चा अनेकदा होते. नगर जिल्हा सर्वात मोठा आहे ही वस्तुस्थिती आहे. प्रशासकीय दृष्ट्या जिल्हा विभाजन गरजेचे आहे. नगर जिल्हा मोठा असल्याने गुन्हेगारी वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही केसरकरांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळात सेनेला पुन्हा अवजड उद्योगमंत्री पद दिले गेल्याने सेना नाराज आहे का, याबाबत केसरकरांना विचारले असता, कुठलेही खाते लहान किंवा मोठे नसते आपल्याला मिळालेल्या खात्यात स्वतःच्या कामाचा ठसा कसा उमटवता हे महत्त्वाचे असते. अवजड उद्योग खाते महाराष्ट्राच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योग वाढवण्यास मदत होईल. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजून मंत्रीपदे सेनेच्या पदरात पडेल असा विश्वासही केसरकरांनी व्यक्त केला.