अहमदनगर - कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवून केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. याबाबत केंद्राचा हेतू शुद्ध नसल्याचेही थोरात म्हणाले.
केंद्र सरकारने कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) दिला आहे. या घटनेवरुन थोरातांनी केंद्र सरकारवर टीका केली. अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना थोरात यांनी केंद्राच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. भाजप अशा निर्णयातून समाजात भेद निर्माण करत असल्याचेही थोरात म्हणाले. राज्य एकीकडे या प्रकरणाचा तपास करत असतानाही पुन्हा हा तपास एनआयएकडे देणे यामागे केंद्र सरकारचा हेतू शुद्ध नसल्याचे थोरात म्हणाले. यावेळी पद्मश्री पुरस्कार घोषित झालेले आदर्शग्राम हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचा सपत्नीक सत्कारही थोरात यांनी केला.