शिर्डी - गेल्या वर्षभरापासून दुधाला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे दूध उत्पादकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. दूधदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा संघर्ष केला मात्र, त्यांच्या संघर्षाला अद्यापही यश आले नाही. त्यातच कोरोनाचा लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत होता, अशा परिस्थितीत राहुरी तालुक्यातील महालगावमधल्या गोधन दूध डेअरीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
शेतकऱ्यांच्या पत्नीस पैठणी-
वर्षभर घातलेल्या दुधासाठी या डेअरी चालकाने प्रतिलिटर १ रुपये ५२ पैसे प्रमाणे होणारी रक्कम शेतकऱ्यांना परतावा दिला आहे. तसेच प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या पत्नीस पैठणी आणि दिवाळीही फराळ भेट देण्याचा त्सुत्य उपक्रम राबविला आहे.
दुधाला उत्तम भाव-
राहुरी तालुक्यातील महालगाव येथील गोधन डेअरी फार्मचा चेअरमन ज्योती चौरे यांनी ही डेअरी सुरू केली आहे. या डेअरीचे दूध थेट गुजरात मधल्या अमुल डेअरीला जाते. ना नफा ना तोटा या तत्वावर ही डेअरी सुरू करण्यात आली आहे. डेअरकडून यावर्षीही दुधाला उत्तम भाव देत बळीराजाचा विश्वास संपादन केला गेला. तसेच दूध दरात कुठलीही कपात न करता प्रति लिटर 1 रुपया 52 पैसे प्रमाणे परतावा दिवाळीनिमित्त भेट दिला आहे.
एकीकडे सहकारी दुध उत्पादक संस्था आणि डेअरी मार्फत शेतकऱ्यांच्या दुधाला अत्यल्प दर दिला जात आहे. मात्र, चौरे यांनी दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्याचेही हीतही जोपासले आहे. त्याच्या या उपक्रमाचे बळीराजासह सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.