शिर्डी - जलशक्ती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आराखड़्याबाबत जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची शिर्डीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. जलशक्ती अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या पाच तालुक्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत, याबाबत जलशक्ती अभियानाच्या नोडल अधिकारी रिचा बागल यांनी माहिती दिली.
बागायती समजल्या जाणाऱ्या उत्तर नगर जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातील भुजल पातळी खालावल्याने केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत जलशक्ती अभियान राबविले जात आहे. या अभियानात राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरी या पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा हा विविध सामाजिक आणि नावीन्यपूर्ण उपक्रमात कायमच देशासमोर आदर्श निर्माण करत आला आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानातही हा जिल्हा अग्रेसर असेल आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून इतरांसमोर आदर्श निर्माण करेल, असा विश्वास रिचा बागल यांनी व्यक्त केला.
जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवड झालेल्या पाच तालुक्यात जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक तसेच इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यामध्ये चांगले काम केले जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले.