अहमदनगर - महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हे पालिकेत कामाला असणाऱ्या विधवा महिलेच्या घरी सतत जाऊन मद्यपान करत होते. मद्यपानास विरोध करणाऱ्या महिलेच्या अल्पवयीन मुलास बोरगेंनी मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आज (शुक्रवार) बोरगे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात मुख्य आरोपी हा पालिकेच्या अग्निशामक दलाचा प्रमुख शंकर मिसाळ आहे. याबरोबर डॉ. अनिल बोरगे यांच्यासह आणखी एक जण अशा तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरातील जुनाबाजार भागातील मैदानाजवळ संबंधित अल्पवयीन मुलाला तिघांनी मारहाण केली होती. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमाक विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ व एका कर्मचाऱ्याने बोल्हेगाव येथील मुलाच्या घरात घुसून दारू पिऊन गोंधळ घातला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या अनैतिक संबंधाच्या प्रकरणाबाबत त्या मुलाने बिंग फोडले होते. याबाबत अल्पवयीन मुलाने तोफखाना पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. तेव्हापासून संबंधित मुलाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही अधिकारी डॉ. बोरगे व मिसाळ पसार झाले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी त्या दोघांचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविला आहे. मिसाळ याला काही दिवसापूर्वी जामीन मंजूर झाल्यानंतर डॉ. बोरगेंनाही आता जामीन मंजूर झाला आहे.
डाॅ. बोरगे हे कोरोनासंदर्भात नोडल अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांचा पदभार आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अग्निशामक विभागाचा भार उपअभियंता कल्याण बल्लाळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिकेची इज्जत चव्हाट्यावर आली आहे. नगर शहरात कोरोनाने धुमाकुळ घातला असताना कोरोनाविषयक काम पाहणारे नोडल अधिकारी मात्र नाजूक प्रकरणात अडकले आहेत. लोकांच्या आरोग्याचा विचार करण्याऐवजी या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे शहरातील मोठा परिसर हाॅटस्पाॅट करण्याची वेळ आली असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.