शिर्डी : शेतकरी मुलांना आज अनेक मुली लग्नासाठी नकार देत आहेत. असाच एक अनुभव आलेल्या योगेश या शेतकरी पुत्राने शिर्डीतील साई आश्रया अनाथालयातील महेश्वरीशी आज रेशीमगाठ बांधली. योगेश आणि महेश्वरी यांच्या लग्नाला शिर्डीतील राजकीय नेते, शिर्डी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह अनेकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे अनाथ असलेल्या महेश्वरीला आपण अनाथ नसल्याचं दिसून आलं आहे. तर या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मुलांसमोरील समस्या देखील समोर आल्या आहेत.
8 एकर, रोज 80 लिटर दुध, एकुलता एक तरीही योगेशला नाकारले
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील खुर्द हिसवळ येथील योगेश सुधाकर आहेर हा होतकरू तरुण शेतकरी आहे. घरी 8 एकर बागायती शेती तसेच गाई देखील आहेत. त्यामुळे दररोज 80 ते 90 लिटर दुधही त्याच्याघरी निघते. मात्र शेतकरी नवरा नको ग बाई म्हणून योगेशला अनेक मुलींनी नकार दिला आहे. योगेश हा एकुलता एक मुलगा आहे.
अखेर मुलगी मिळाली...
अनेक मुलींनी योगेशला नाकारले. त्यामुळे योगेशचे वय निघुन गेल्यावर पुन्हा लग्नाला अडचण येईल या विचाराने योगेशचे वडिल सुधाकर यांनी शिर्डीतील पाहुणे साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांना योगेशसाठी मुलगी पाहण्यास सांगितले. योगा योगाने सचिन तांबे आणि साई आश्रया अनाथालयाचे व्यवस्थापक गणेश दळवी यांची भेट झाली आणि त्यावेळी सचिन तांबे म्हणाले, की आमच्याकडे एक मुलगा आहे. तर दळवी म्हणाले, की आमच्याकडे पण अनाथ आश्रमात एक मुलगी लग्नासाठी आहेत. या नंतर दोन्ही कुटुंबात मुली-मुलाला पाहण्याचे कार्य पार पडेल.
शेतकरी नवरा नको गं बाई म्हणणाऱ्यांना महेश्वरीचा संदेश
आज (17 सप्टेंबर) योगेश आणि महेश्वरीचा शुभविवाह शिर्डीतील साई आश्रया अनाथालयात पार पडला. योगेश आणि महेश्वरी यांच्या लग्नाला आज शिर्डीतील सर्वच मोठ्या नेत्यांसह पोलीस प्रशासनाने हजेरी लावली. त्यामुळे एकेकाळी स्वतःला अनाथ समजणाऱ्या महेश्वरीला आपण अनाथ असल्याच जाणवले देखील नाही. तर शेतकरी मुलागा नको म्हणून योगेशला नाकारणाऱ्या मुलींना देखील आज या लग्नाने दाखवून दिले आहे की शेतकरी मुले पण काही कमी नाहीत, त्यांनाही मुली मिळतात.
कोण आहे महेश्वरी
महेश्वरीचे (रेड्डी) मुळची मुंबईची आहे. अवघ्या 16 वर्षाची असताना आई-वडिलांनी तिची साथ सोडली. तर, नातेवाईकांनी तीला चर्मरोग झाला म्हणून घराबाहेर हाकलून दिले होते. साईच्या दरबारी आपल्या आसरा मिळेल म्हणून ती शिर्डीत आली. त्यानंतर साईबाबांच्या साईनाथ रूग्णालयात उपचार घेत असताना तेथील डॉक्टरांना मी अनाथ असल्याचे तीने सांगीतले. शिर्डी पोलिसांच्या मदतीने महेश्वरीला शिर्डीतील साई आश्रया अनाथालयात गणेश दळवीने सहारा देत तीचे पालन-पोषण केले. महेश्वरी इंग्रजी माध्यमात शिकलेली असल्याने ती आश्रमातील मुलांनाही शिकवत असे. मात्र माहेश्वरीचं लग्नाच वय झाल्याने गणेशने आज साश्रु नयनांनी तिचं कन्यादान केलं. शिर्डीत साई आश्रयच्या दिडशे लोकांच्या परिवारात वाढलेल्या महेश्वरीशीचा आज मोठ्या थाटामाटात विवाह करण्यात आला. घराच्या श्रीमंतीऐवजी योगेशने दाखवलेली मनाची श्रीमंती पाहुन, त्यात शेतकरी नवरा नको म्हणून नाकरेल्या मुलींना मॊहेश्वरीने एक संदेश दिला आहे. रक्ताच्या नात्यातील लोकांनी नाकरलं होत, मात्र साईंच्या शिर्डीतील आश्रय आणि मोठा परिवारसोडून जात असल्याने महेश्वरीलाही गहीवरुन आलं होतं.
आजपर्यंत सहा मुलींचे लग्न
शिर्डीतील गणेश दळवी हे अनेक वर्षापासून साईबाबांच्या शिर्डीत साई आश्रया अनाथालय चालवत आहेत. या अनाथालयात आजमतीला जवळपास 150 अनाथ मुलं, मुली, वृध्द आहेत. गणेश दळवीने आजपर्यंत सहा मुलींच लग्न लावले. मात्र खेड्यात सासर नको आणि शेतकरी मुलगा नको असं म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात आंजन घालण्यासाठी आज शिर्डीत अनेक मान्यवरांच्या उपस्थिती महेश्वरीचं लग्न एका शेतकरी मुलांशी लावून दिले आहे. श्रीमंती आणि सुबत्ता असुनही शेतकरी मुलांना मुली मिळत नाहीत. या समस्येवर विविध पातळ्यांवर मंथन होऊन मार्ग काढायला हवा, हे आजच्या शिर्डीतील या अनोख्या लग्नातून समोर आले आहे.
हेही वाचा - मोदींच्या बर्थडेला मिळणार गिफ्ट? पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्याने होतील कमी?