अहमदनगर - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०१९ अंतर्गत नाशिक विभागात ७ लाख ५३ हजार १०३ शेतकर्यांना ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती नाशिक महसुल विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिली. तर अहमदनगर जिल्ह्यात २ लाख ५८ हजार ७८७ शेतकर्यांना २ हजार २९६ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितलं. सध्या दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
सोमवारी नगरच्या राहुरी आणि नगर तालुक्यातील जखणगाव येथील शेतकर्यांच्या याद्या प्रातिनिधीक स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्या. या यादीनुसार शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु करण्यात आले. दिनांक २८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्वच गावात याद्यांची प्रसिद्धी होऊन आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे.
महात्मा जोतिराव फुले या योजनेचा सर्वाधिक लाभ अहमदनगर जिल्ह्याला मिळणार असून या योजनेचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. महसूल आणि सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी-कर्मचारी कर्जमुक्ती योजनेच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत. कोणत्याही शेतकर्यांकडून तक्रार येऊ नये तसेच शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची दक्षता घेतली जात असल्याची माहिती व्दिवेदी यांनी दिली.
आधार प्रमाणीकरण अथवा थकीत कर्ज रकमेबाबत कोणाची तक्रार असल्यास ती तालुका किंवा जिल्हा समितीकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच यावर तात्काळ निर्णय घेतला जाणार आहे.