मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत ( Assembly Elections in Gujarat ) महाराष्ट्रातील मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने राज्यातील चार जिल्ह्यांत मतदारांसाठी एक दिवसाची पगारी सुट्टी ( One day paid leave for voters in the state ) जाहीर केली आहे. १ व ५ डिसेंबर अशा दोन दिवशी पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान : शेजारच्या राज्यातही मतदारांना मतदान करता यावे, यासाठी महाराष्ट्रातील सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. नोकरदार मंडळींना मतदान करता यावे, यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत दिली जाते. राज्यातील निवडणुकांच्यावेळी असा आदेश देण्यात येतो. गुजरातमधील अनेक नागरिक महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात नोकरी, व्यवसायासाठी आलेले आहेत. त्यांची नावे गुजरातमधील मतदार यादीतच आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यासाठी तेथे सुट्टी असेलच मात्र, महाराष्ट्रात आलेल्या मतदारांनाही तेथे जाऊन मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ही सुट्टी त्यांना देण्यात येणार ज्यांचे मतदान गुजरातमध्ये आहे : कामगार विभागांतर्गत येणार सर्व उद्योग, महामंडळे, कंपन्या, संस्था, औद्योगिक उपक्रम, इतर अस्थापना या सर्वांनी १ डिसेंबर ५ डिसेंबर अशा योग्य त्या दिवशी ही सुट्टी द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जर सवलत न मिळाल्याने कोणी मतदार मतदानापासून वंचित राहिल्याची तक्रार आली, तर संबंधितांविरूद्ध कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाला अनुसरून हा आदेश देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ज्यांचे मतदान गुजरातमध्ये आहे, अशा कामगारांना, अधिकाऱ्यांना ही सुट्टी देण्यात येणार आहे.