शिर्डी (अहमदनगर) - राज्यातील धार्मिकस्थळे खुले करण्यासाठी भाजपा तसेच विविध संघटनांकडून राज्यभर आंदोलने करण्यात आली. यानंतर राज्य शासनाने अखेर आज (शनिवारी) दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंदिरे खुले करण्याची परवानगी दिली आहे. शासनाच्या या निर्णयानंतर शिर्डीतील भाजपा कार्यकर्त्यांनी साई मंदिराजवळ फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
8 महिन्यांपासून पार्थनास्थळे बंद -
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 17 मार्चपासुन साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. यानंतर अनलॉकमध्ये हळूहळू करून राज्यातील सर्वच व्यवसाय सुरू करण्यात येत आहे. मात्र, प्रार्थनास्थळे खुली करण्यास सरकारने परवानगी दिली नव्हती. शासन प्रार्थनास्थळे खुले करण्याचा निर्णय घेत नसल्याने भाजपाच्यावतीने आंदोलने करण्यात आली. अखेर राज्य शासनाने दिवाळी पाडव्याचा दिवशी राज्यातील मंदिरे खुले करण्याची परवानगी दिली.
हेही वाचा - दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे सुरू होणार
भाजपाच्यावतीने आनंदोत्सव -
शासनाच्या या निर्णयानंतर शिर्डीतील भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने साई मंदिराच्या गेट क्रमांक 4 आणि चावडी मंदिर समोर फटाके फोडले. तसेच पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. गेल्या आठ महिन्यांपासुन साईबाबांचे मंदिर बंद असल्याने शिर्डीतील सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र, आता राज्य सरकारने मंदिरे खुले करण्याची परवानगी दिल्याने शिर्डीतील व्यावसायिकांच्या आणि भाविकांना खऱ्या अर्थाने सरकारने दिवाळीचे एक गिफ्ट दिले असेच म्हणावे लागेल.