अहमदनगर - देशावर कोरोनाचे संकट मार्च महिन्यात घोंगावू लागले, तसे देशाला लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. पण नोव्हेंबर महिन्यापासूनच गणेश मूर्ती निर्मितीच्या कामाला लागलेल्या गणेश मूर्ती कारखानदार आणि कारागीर यांना सुरुवातीला लॉकडाऊन आणि आता सरकारच्या नियमावलीमुळे अनंत अडचणींना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या मूर्तींना मागणीच नसल्याने गुंतवलेले भांडवल निघणार कसे आणि कारागिरांना पगार द्यायचे कसा? या चिंतेने सतावले आहे.
सुखकर्त्या गणेशाचे आगमन एका महिन्यावर येऊन ठेपले आहेत. मात्र, गणेशमूर्ती कारखान्यात स्थानिक आणि विविध जिल्ह्यातून येणारे ठोक मूर्ती ग्राहक तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते येतच नसल्याने अद्यापही भयान शांतता आहे. कोरोनाच्या संकटात घाबरलेला ग्राहक सरकारच्या नियमावलीने अजूनही आपली पावले गणेशमूर्ती कारखान्यांकडे वळवत नसल्याचे चित्र आहे. मात्र, यामुळे मूर्ती कारखानदार हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
प्रत्येक गणेश मूर्ती कारखान्यात किमान 15 ते 20 कारागीर असतात. एकट्या नगरमध्ये शंभरावर मूर्ती बनवणारे कारखाने असले तरी अनेकांनी कोरोनाच्या संकटात आपले कारखाने बंद ठेवले आहेत. जे कारखाने सुरू आहेत ते मजुरी देतील की नाही या शंकेने येथील कारागीर धास्तावलेले आहेत. सरकारने या परिस्थितीत आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा कारागिरांना आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वीच कारखाने सुरू झाले होते. मात्र, आता तयार झालेल्या या मूर्ती विकल्या जाण्याची शक्यता वाटत नसल्याने त्या झाकून ठेवाव्या लागल्या आहेत. मोठ्या मूर्तींना बंदी असल्याने तयार केलेला साचा वाया गेला आहे, तर मुंबईच्या लालबाग राजा मंडळाने यंदा प्रतिमापूजन करण्याची घोषणाही राज्यभरातील मूर्तीकारांच्या व्यवसायाला खाईत लोटणारा असल्याची भावना कारखानदार व्यक्त करत आहेत.
दरवर्षी मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात 20 ते 30 टक्के वाढ होते. मात्र, मुर्तींची किंमत ही चार-चार वर्ष मागणी अभावी आहे तीच ठेवावी लागते. यंदा तर कोरोनाची भीती आणि सरकारने सार्वजनिक मंडळे आणि भक्तांना केलेल्या आवाहनामुळे अनेकांचा कल प्रतिमा पूजन किंवा धातूच्या मूर्ती पूजनाकडे असल्याने गुंतवलेले भांडवल वसूल होऊन कारागिरांच्या मेहनतीचे पैसे तरी देता येतील की नाही ही काळजी कारखानदारांच्या आणि कारागिरांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.