अहमदनगर : शिर्डीतील रामनवमी उत्सव सर्वांच्याच कुतुहलाचा विषय आहे. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची बुधवारपासून भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर विद्युत रोशनाई तसेच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिर्डीत रामनवमी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पुजा करून साईमुर्ती आणि साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला.
उत्सवाचे यंदाचे हे 112 वे वर्ष : साईबाबांना मंगलस्नानही कावडीतून आणलेल्या पाण्याने करण्यात आले आहे. सकाळी काकड आरतीनंतर बाबांची पोथी, विणा आणि प्रतीमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविक राम जन्माचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत करण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहे. शिर्डीतील रामनवमी उत्सवाचे यंदाचे हे 112 वे वर्ष आहे. भाविकांमध्ये साईभेटीचा आनंद ओसंडून वाहत आहे. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
भव्य देखावे उभारले आहेत : उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साई मूर्तीलाही विविध अलंकारांनी सजविण्यात आले आहे. साई मंदिराच्या 4 नंबर प्रवेशद्वारावर द्वारकामाई मंडळाच्या वतीने भव्य श्रीराम प्रवेशद्वार उभारले आहे. लेंडीबागेत साई पालखी मिरवणूक व साई प्रसादालयाच्या प्रवेशद्वारावर शिव भोला भंडरी, साई भोला भंडारी हे भव्य देखावे उभारले आहेत.
साई मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले : रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात. शिर्डीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतुर झालेला भक्तगण साई मुर्तीची केवळ एक झलक पाहाण्यासाठी उत्सुक असतो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील उर्जा भाविकाला वर्षभर पुरणारी असते. त्यामुळे हा उत्सव 'याची देहि याची डोळा' अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक साई दरबारी दाखल झाले आहेत. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा, याकरिता साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेत साई संस्थांच्या वतीने आज रात्रभर साई मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा : Ram Navami २०२३ : रामनवमीला बनवा या खास डिश, तुमचा सण होईल आनंदात साजरा