अहमदनगर- बिबटच्या हल्ल्यात जिल्ह्यातील चिमुकलीला प्राण गमवावे लागले आहेत. पाथर्डी तालुक्यातील मढी येथील साळवे वस्तीवरील श्रेया साळवे या लहान मुलीला उचलून नेत बिबट्याने भक्ष केले आहे. शेजारच्या वस्तीवरील एका महिलेलाही बिबट्याने जखमी केले आहे. तिच्या पतीने प्रतिकार केल्याने महिलेचे प्राण वाचू शकले आहेत. ही घटना बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
बिबट्याने उचलुन नेलेल्या मुलीचा अर्धवट मृतदेह गुरुवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांना डोंगरात सापडला. वनविभागाने घटना घडलेल्या परिसरात पिंजरे लावले आहेत. परिसरात असलेल्या बिबट्याच्या वावराने शेतकरी घाबरुन गेले आहेत.
मढी गावापासून दोन किलोमीटर अतंरावर दक्षिणेला साळवेवस्ती आहे. तेथे दोन कुटुंब शेजारी-शेजारी छप्पराच्या घरात शेतीमधे राहतात. विजय साळवे हे पत्नी(उषा) व मुलासह राहतात. शेजारीच सुरज साळवे त्यांचे आई, वडील,पत्नी व मुलगी असे राहत आहेत. उषा विजय साळवे या घरासमोर असताना बुधवारी रात्री आठ वाजता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. विजय साळवे यांनी बिबट्याला प्रतिकार केल्याने उषा साळवेंचे प्राण वाचले आहेत. त्यानंतर बिबट्याने शेजारीच राहणाऱ्या वस्तीकडे मोर्चा वळविला. साडेतीन वर्षाची श्रेया साळवे ही लघुशंकेसाठी छपराच्या दारात चालली होती. बाहेर अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिला उचलले. श्रेयाचे आजी-आजोबा ओरडले पण बिबट्या श्रेयाला घेऊन डोंगराच्या बाजूने निघून गेला. रात्रीची वेळ असल्याने त्यांना तातडीने मदत मिळू शकली नाही. मढी ग्रामस्थांना माहिती समजली असता त्यांच्यासह तिसगाव वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मदतीला धावले.